-अण्णाभाऊ साठे जयंती सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘फकीरा’ कादंबरी व सन्मानचिन्ह प्रदान
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत सकल मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या तालुकास्तरीय समारोपीय जयंती उत्सवाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. यावेळी पत्रकारिता तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिस मित्र समितीचे सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष तथा पत्रकार अरुण तौर यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तोतारामजी कायंदे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय अंभोरे आणि भाजपचे राज्य महामंत्री सर्जेराव जाधव यांच्या हस्ते अरुण तौर यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची प्रसिद्ध ‘फकीरा’ कादंबरी तसेच सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे तसेच सामाजिक कार्यात सक्रिय योगदान देणे, या कार्याची दखल घेत त्यांचा हा सन्मान करण्यात आल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, लहुशस्त्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजूबाबा गायकवाड, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, माजी सरपंच भिकाभाई नेमाडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक समता, बंधुता आणि न्यायाची मूल्ये समाजात रुजविण्याचा संदेश या जयंती सोहळ्यातून देण्यात आला. कार्यक्रमाला सिंदखेडराजा तालुक्यातील बहुसंख्य समाजबांधवांची उपस्थिती लाभली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. अरुण तौर यांच्या सन्मानामुळे पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळाले असून, सामाजिक प्रश्न निर्भीडपणे मांडण्याची जबाबदारी अधिक बळकट झाली असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

