-डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा होणार सन्मान; ‘गणराया पोलिस मित्र पुरस्कार’ची घोषणा — एसपी निलेश तांबे
बुलढाणा (प्रतिनिधी) : गणेशोत्सव हा भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त, पर्यावरणपूरक आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने शांततेत साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्हावासीयांना केले. विशेष म्हणजे, गणेशोत्सव काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गणेश मंडळांना पोलिस व प्रशासनाच्या वतीने ‘गणराया पोलिस मित्र पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची माहितीही एसपी निलेश तांबे यांनी दिली.
जिल्हा नियोजन सभागृहात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार श्वेता महाले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत गणेशोत्सवाच्या काळातील कायदा-सुव्यवस्था, ध्वनिप्रदूषण, पर्यावरण संवर्धन तसेच उत्सव शांततेत पार पाडण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देण्याची आणि मोठ्या आवाजातील डीजेला आळा घालण्याची गरज व्यक्त केली. मोठ्या आवाजातील डीजेमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच आजारी व्यक्तींना सहन करावा लागतो. त्यामुळे उत्सवाचा आनंद घेताना इतरांच्या आरोग्याला आणि शांततेला बाधा पोहोचू नये, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. यावेळी एसपी निलेश तांबे यांनी ढोल-ताशा, लेझीम आणि इतर पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत उत्सवातील उत्साह कायम ठेवतानाच सामाजिक शांतता आणि सलोखा अबाधित ठेवण्यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
उत्कृष्ट मंडळांना ‘गणराया पोलिस मित्र पुरस्कार’
गणेशोत्सव काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गणेश मंडळांना ‘गणराया पोलिस मित्र पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार पोलिस व प्रशासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती एसपी निलेश तांबे यांनी दिली. डीजेचा वापर टाळणे, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, स्वच्छता, सामाजिक प्रबोधन, रक्तदान, आरोग्यविषयक उपक्रम, गरजूंना मदत तसेच सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील सकारात्मक हेतू आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी केवळ देखावे आणि रोषणाईपुरता उत्सव मर्यादित न ठेवता समाजोपयोगी आणि विधायक उपक्रम राबवावेत, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणणारा उत्सव असल्याने कोणत्याही अफवा, वाद किंवा गैरसमजांना थारा न देता सर्व समाजघटकांनी परस्पर सहकार्य करावे, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. ‘भक्तीचा उत्साह असू द्या; मात्र ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट नको!’ असा संदेश देत यंदाचा गणेशोत्सव पारंपरिक, पर्यावरणपूरक आणि सामाजिक सलोखा जपणारा करण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात यंदा डीजेच्या दणदणाटाऐवजी ढोल-ताशा, लेझीम आणि पारंपरिक वाद्यांचा निनाद घुमण्याबरोबरच ‘गणराया पोलिस मित्र पुरस्कार’साठी कोणती गणेश मंडळे उत्कृष्ट कार्य करतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

