-सकाळी १० वाजता अपघात; अवघ्या ७ किमी अंतरासाठी रुग्णवाहिकेला तब्बल तासभर विलंब—आपत्कालीन सेवेवर गंभीर प्रश्न
वडगाव तेजन(वाजिद खान) : लोणार-वडगाव तेजन मार्गावर सकाळी १० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन गंभीर अपघात झाला. या अपघातात खामगाव येथील दोन युवक आणि शारा येथील दोन युवक जखमी झाले असून, खामगाव येथील दोन्ही युवकांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोटरसायकल क्रमांक MH 28 K 2858 ही खामगावकडून लोणारच्या दिशेने जात असताना समोरील मोटरसायकल क्रमांक MH 28 AR 2458 सोबत तिची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकींवरील चार युवक जखमी झाले. जखमींपैकी एका युवकाच्या डोळ्याला दुखापत झाली असून, शारा येथील युवकांच्या हात-पायाला मार लागल्याची माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण अधिकृत तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
अपघाताच्या वेळी रुग्णवाहिका कुठे होती, आपत्कालीन कॉल मिळाल्यानंतर ती किती वेळाने रवाना झाली आणि घटनास्थळी पोहोचण्यास नेमका विलंब का झाला, याची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होणे अत्यावश्यक असते. त्यामुळे या घटनेतील विलंबाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि दोष आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ग्रामीण भागातील आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा अधिक तत्पर व सक्षम करण्याची गरजही या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. अपघातातील चारही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, खामगाव येथील दोन युवकांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

