देऊळगावराजा तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळूतस्कराच्या संभाजीनगरमधून आवळल्या मुसक्या!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– बुलढाणा एलसीबीची धडक कारवाई; अंढेरा फाट्यावरील ‘त्या’ थरारनाट्यानंतर फरार झालेला हर्षल अंभोरे जाळ्यात!
– महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात पुकारले होते कामबंद आंदोलन

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : अवैध गौणखनिज वाहतुकीवर धडक कारवाई करणाऱ्या महसूल पथकावर वाहनाने जीवघेणा हल्ला चढवून फरार झालेल्या मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून अत्यंत शिताफीने ही कारवाई केली. हर्शल मनोहर अंभोरे (वय २३, रा. एकलारा, ता. चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

१९ ऑगस्ट रोजी सकाळी अंढेरा फाटा येथे देऊळगाव राजाच्या तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक अवैध गौणखनिज वाहतुकीविरोधात कारवाई करत होते. यादरम्यान विनापरवाना चार ब्रास वाळू वाहून नेणारा पांढऱ्या रंगाचा टिपर पथकाने पकडला. कारवाई सुरू असतानाच आरोपी हर्षल अंभोरे याने घटनास्थळी धाव घेऊन शासकीय कामात अडथळा आणला. त्याने टिपरचालकाला गाडी पळवून नेण्यास चिथावणी दिली.

महसूल पथकाने पळून जाणाऱ्या टिपरचा पाठलाग केला असता, चालकाने महसूलच्या वाहनाला जीवे मारण्याच्या उद्देशाने थेट धडक दिली. यानंतर अंभोरे याने स्वतःची गाडी पथकाच्या वाहनासमोर आडवी लावून टिपर पळवून नेण्यास थेट मदत केली. याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. महसूल पथकावरील या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट पसरली होती. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी जिल्हा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), पटवारी संघटना आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी ‘कामबंद आंदोलन’ पुकारले होते. आरोपीला तात्काळ अटक करण्याची ठाम मागणी संघटनांनी लावून धरली होती.

घटनेनंतर आरोपी हर्षल अंभोरे फरार झाला होता. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. एलसीबीच्या पथकाने आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने आरोपी छत्रपती संभाजीनगर परिसरात लपल्याची पक्की माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने ४ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे छापा मारून अंभोरेला ताब्यात घेतले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वात पोउनि. प्रताप बाजड, शरदचंद्र गिरी, जगदेव टेकाळे, युवराज राठोड, पुरुषोत्तम आघाव, अमोल अंभोरे, पूजा जाधव, विलास भोसले तसेच एलसीबीचे राजू आडवे, पवन मखमले, ऋषिकेश खांडेराव आणि तांत्रिक विश्लेषक कैलास ठोंबरे यांच्या संयुक्त पथकाने फत्ते केली.

Share This Article
Exit mobile version