– एसडीओ कार्यालयासमोर वाळलेल्या सोयाबीन पेंढ्यांसह निदर्शने
– कर्जमाफी, अखंडित वीजपुरवठा आणि सरसकट नुकसानभरपाईची मागणी; प्रशासनाला निवेदन सादर
खामगाव/बुलढाणा (बाळू वानखेडे) : पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून, बुलडाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करा आणि शेतकरी बांधवांना तात्काळ आर्थिक मदत द्या, या प्रमुख मागितीसाठी आज ४ सप्टेंबर रोजी किसन काँग्रेस व खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयासमोर धडक आंदोलन करण्यात आले. हातामध्ये वाळलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या घेत कार्यकर्त्यांनी प्रशासकीय धोरणाविरोधात आणि शेतकरीहिताच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
- बुलडाणा जिल्ह्यात तातडीने ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करावा.
- विविध जाचक निकषांमुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या सर्व थकीत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा.
- शेतातील पिकांना वाचवण्यासाठी नियमित व दिवसभर अखंडित वीजपुरवठा करावा.
- नादुरुस्त झालेले सर्व विद्युत ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) विनाविलंब दुरुस्त करून सुरळीत वीजपुरवठा करावा.
- पावसाअभावी झालेल्या संपूर्ण खरीप पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव नुकसानभरपाई द्यावी.
आंदोलनात काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहाण, शहराध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील, कार्याध्यक्ष किशोरआप्पा भोसले, ओबीसी विभागाचे सचिव अजय तायडे, किसन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश इंगळे, कार्याध्यक्ष कैलास साबे, कैलास फाटे, अचलेश्वर दिपके, अतुल सिरसाट यांच्यासह शेकडो पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुकलेल्या पेंढ्या आणि गहिवरलेले अश्रू
निवेदन देताना एसडीओ डॉ. रामेश्वर पुरी यांच्याशी चर्चा करताना शेतकऱ्यांनी आपल्या शेतात करपून गेलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. यंदाच्या हंगामात तरी हाती काहीतरी लागेल या अपेक्षेने उसनवारी करून आणि सोन्या-नाण्यांचे सावज उभे करून बळीराजाने पेरणी केली होती; मात्र निसर्गाच्या लहरीपणाने होत्याचे नव्हते केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनासमोर आपली व्यथा मांडताना अनेक शेतकरी बांधवांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाल्याने उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा परिसर काही काळ हेलावून गेला होता.

