‘डीजे’चा धडाका थांबवा! रस्ते अडवणाऱ्या डीजेला परवानगी नको; सुबोध सावजींची पोलिस अधीक्षकांकडे मागणी!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-डीजे वाजवा, पण नियमांत! रस्ते, चौक अन् रुग्णालयांचा त्रास टाळा; सुबोध सावजींचा प्रशासनाला इशारा

बुलढाणा (सुरेश हुसे) : धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांच्या नावाखाली जिल्ह्यात वाढत चाललेल्या डीजेच्या वापरामुळे वाहतूक कोंडी, ध्वनिप्रदूषण आणि नागरिकांना होणारा त्रास यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री तथा माजी विधानसभा सदस्य सुबोध सावजी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांना ३ सप्टेंबर रोजी निवेदन देऊन डीजेला परवानगी देताना कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

बुलढाणा जिल्ह्यातील खेडेगाव, गाव तसेच शहरांमध्ये धार्मिक, सामाजिक व राजकीय कार्यक्रमांच्या मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर डीजेचा वापर केला जातो. अनेकदा डीजे रस्त्याच्या मध्यभागी उभा केला जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नागरिक, रुग्ण, विद्यार्थी तसेच वाहनधारकांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने परवानगी देताना स्पष्ट नियम घालावेत, अशी भूमिका सावजी यांनी मांडली आहे.

रस्ता अडवणाऱ्या डीजेला परवानगी नको

दहा फुटांपर्यंत रुंदी असलेल्या रस्त्यावर डीजे उभा करून वाजविण्यास परवानगी देऊ नये. डीजेच्या पुढे-मागे संपूर्ण रस्ता अडवल्याने आपत्कालीन वाहने आणि सर्वसामान्य वाहनांना मार्ग मिळत नाही. तसेच डीजेची मिरवणूक सुरू असताना त्याच्या बाजूने वाहनांना ये-जा करता येईल एवढी जागा ठेवणे बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

चौकात डीजे उभा करण्यास बंदी

गावातील किंवा शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये डीजे उभा करून वाहतूक ठप्प होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. कोणत्याही चौकात डीजे उभा करण्यास परवानगी देऊ नये, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विद्युत तारांबाबतही खबरदारीची मागणी

डीजेची उंची विद्युत तारांपेक्षा किमान सहा इंच खाली असावी. डीजेची उंची वाढविण्यासाठी बांबू किंवा इतर साधनांच्या मदतीने विद्युत तारा वर उचलण्याचा प्रकार होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशी मागणी सावजी यांनी केली आहे.

रुग्णालये, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा विचार करा

कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच गावातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोठा त्रास होतो. त्यामुळे डीजेच्या आवाजाची मर्यादा निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. रस्त्यालगतच्या दुकानांच्या काचा किंवा शोकेसला कंपनांमुळे नुकसान होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मिरवणुकीच्या वेळेवर बंधन आवश्यक

डीजेच्या मिरवणुकीसाठी निश्चित वेळेचे बंधन असावे. रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डीजे सुरू राहिल्यास शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिस आणि महसूल प्रशासनाने समन्वयाने नियमांची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा सावजी यांनी व्यक्त केली. “शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस आणि महसूल प्रशासनाची आहे. त्यामुळे डीजेला परवानगी देताना नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा,” अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून, केलेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी, असेही सावजी यांनी म्हटले आहे.

Share This Article
Exit mobile version