-बुलढाणा, जालना, परभणी, वाशिम जिल्ह्यांत प्रवेशबंदी; किनगाव राजा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : चोरीच्या गुन्ह्यांमुळे पोलिसांच्या रडारवर आलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना अखेर पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. दुसरबीड येथील दत्ता प्रकाश बिथरे (३४), विलास भाऊलाल दुंडीयार (३६) आणि मंगेश कुंडलिक अवचार (२२) या तिघांना तब्बल दोन वर्षांसाठी बुलढाणा, जालना, परभणी आणि वाशिम जिल्ह्यांच्या हद्दीबाहेर तडीपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी २९ ऑगस्ट रोजी तडीपारीचा आदेश काढला असून, ३ सप्टेंबर रोजी तिघांनाही जिल्ह्याच्या हद्दीबाहेर सोडण्यात आले.
किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीसह विविध गुन्ह्यांमध्ये या तिघांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. परिसरातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासोबतच सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी ही कठोर कारवाई केली.
चोरीच्या गुन्ह्यांची मालिका; पोलिसांचा तडीपारीचा ‘फॉर्म्युला’
दत्ता बिथरे, विलास दुंडीयार आणि मंगेश अवचार यांच्याविरुद्ध किनगाव राजा पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत. तसेच चंदनझिरा पोलिस ठाण्यातील गुन्ह्याचाही त्यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर किनगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सपोनि संजय मातोंडकर यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ५५(१) अन्वये तडीपारीचा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मंजुरीसाठी पाठविला. प्रस्तावाची दखल घेत पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी २९ ऑगस्ट रोजी तिघांनाही चार जिल्ह्यांच्या हद्दीबाहेर दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला. आदेशाची अंमलबजावणी करत पोलिसांनी गुरुवारी तिघांना जिल्ह्याबाहेर रवाना केले.
अवैध धंद्यांविरोधातही कारवाईचा धडाका
दरम्यान, किनगाव राजा पोलिसांनी केवळ गुन्हेगारांवरच कारवाई न करता अवैध धंद्यांविरोधातही मोहीम तीव्र केली आहे. ऑगस्ट २०२६ पर्यंत दारूबंदी कायद्यान्वये ९२ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये २५ प्रकरणांची वाढ झाली आहे. जुगारविरोधी कारवाईत २१ प्रकरणे दाखल करण्यात आली असून, मागील वर्षाच्या तुलनेत १३ प्रकरणे अधिक आहेत. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध तब्बल ५४ प्रकरणे दाखल करण्यात आली असून, मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ४९ प्रकरणांची वाढ झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हेगारांना लगाम; प्रतिबंधात्मक कारवाईलाही वेग
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी किनगाव राजा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईलाही मोठ्या प्रमाणात वेग दिला आहे. बीएनएसएस कलम १२६ व १३५ अन्वये ४६५ जणांवर, कलम १२८ अन्वये ८ जणांवर, कलम १२९ अन्वये २५ जणांवर, तर प्रोका कलम ९३ अन्वये १२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांचा वचक निर्माण करण्यास मदत होणार असून, परिसरातील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली किनगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सपोनि संजय मातोंडकर तसेच पोलिस हेड कॉन्स्टेबल विष्णू मुंढे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश वारकरी, सुभाष गिते, संदीप डोंगरे, मिलिंद सोनपसारे, विजेता पवार आणि जीवन जायभाये यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. चोरट्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तडीपार, प्रतिबंधात्मक कारवाई आणि अवैध धंद्यांवरील कारवाईचा त्रिसूत्री कार्यक्रम सुरू केला आहे.

