सण-उत्सव साजरे करताना आपण आणि प्रशासन हा महत्त्वाचा दुवा : अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन; साखरखेर्डा येथे शांतता समितीची बैठक

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : “सण-उत्सव साजरे करताना आपण आणि प्रशासन हा महत्त्वाचा दुवा आहे,” याची जाणीव ठेवून सण-उत्सव साजरे करावेत. इतिहासात घडलेल्या अप्रिय घटना पुन्हा घडणार नाहीत, याची काळजी घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून येणारा गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करावा. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या धर्माचा आदर करीत सौहार्दाचे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले. साखरखेर्डा पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

पोळा व गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्ष आणि सदस्यांची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार युवराज रबडे, सरपंच अमित जाधव, भाजपचे प्रदेश प्रतिनिधी रावसाहेब देशपांडे, माजी उपसरपंच रामदाससिंग राजपूत, माजी सरपंच सुनील जगताप, डी. एन. पांचाळ, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष दसरे, मुख्याध्यापक गजानन कुले, माजी सैनिक अर्जुन गवई, अशोक इंगळे, माजी उपसरपंच सय्यद रफीक, सुरेश राजपूत, गोपाल राजपूत, उपसरपंच संग्रामसिंह राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी, युवा सेना तालुका प्रमुख संदीप मगर, माजी उपसरपंच आयुब कुरेशी, अस्लम अंजुम, कय्यूम मेंबर, असलम शहा, गोपाल पाझडे, गोपाल शिराळे, गजानन इंगळे, ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कायदा हातात घेऊन चालणार नाही, तर एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. ज्याप्रमाणे कावड यात्रा आणि ईद मिलादचे सण शांततेत साजरे झाले, त्याचप्रमाणे पुढील सण-उत्सवही शांततेत व उत्साहात साजरे करावेत. डीजेच्या आवाजावर प्रतिबंध असावा. तसेच गुलाल खेळताना कोणालाही शारीरिक इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अशोक इंगळे, गजानन कुले, अस्लम अंजुम आणि रामदाससिंग राजपूत यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीचे संचालन व प्रास्ताविक ठाणेदार युवराज रबडे यांनी केले.

Share This Article
Exit mobile version