‘जायकवाडीचे पाणी आमच्या हक्काचे, कोणाच्या बापाचे नाही!’

admin Add a Comment 5 Min Read
5 Min Read

-पूर्व भागातील ३२ गावांचा पाण्यासाठी एल्गार; पक्षीय मतभेद बाजूला ठेवून निर्णायक संघर्षाचा शिवाजीराव काकडे यांचा निर्धार

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : जायकवाडी जलाशयातून पूर्व भागातील ३२ गावांसाठी स्वतंत्र पाणी योजना राबवून शेतीला हक्काचे पाणी मिळावे, तसेच या ३२ गावांतील तलाव, बंधारे, नालाबंडिंग व पाणलोट क्षेत्र जायकवाडीच्या पाण्याने भरून देण्यात यावे, यासाठी आता व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला. यासाठी गावागावांत बैठका घेऊन जनजागृती करण्याबरोबरच आंदोलनाचे स्वरूप व दिशा ठरविण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बोधेगाव येथे आज पूर्व भागातील पाणीप्रश्नावर आयोजित बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे यांनी आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले, जायकवाडीच्या पाण्यासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. पूर्व भागातील ३२ गावांसाठी जायकवाडी जलाशयातून स्वतंत्र पाणी योजना राबवून शेतीला पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रश्नासाठी अजित पवार यांचीही साथ मिळाली आहे. सुमारे १२५ कोटी रुपयांच्या योजनेचे २५० कोटी रुपयांच्या योजनेत रूपांतर करून योजना कार्यान्वित करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, केवळ आश्वासनांवर विसंबून न राहता हक्काचे पाणी मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवावा लागेल. ‘पाणी हा धर्म आणि जात आहे. त्यामुळे जात-पात व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून पाण्याच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र यावे. बेफिकीर राहू नका. पाणी आल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही,’ असा इशारा काकडे यांनी दिला. ताजनापूर टप्पा-१साठी कमी पाणी खर्च झाले असून सुमारे तीन लाख घनमीटर पाण्याचा वापर झाला आहे, तर मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. हे पाणी पूर्व भागातील शेतकऱ्यांना मिळण्यासाठी नव्याने संघर्ष उभारण्याची गरज असल्याचे काकडे यांनी सांगितले.

माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे म्हणाल्या, पाण्याचा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्व शेतकऱ्यांचा आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून युवकांनी या प्रश्नात मोठ्या प्रमाणात पुढाकार घ्यावा. धरणग्रस्त शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी मिळविण्यासाठी संघर्ष हाती घ्यावा लागणार आहे. बंद पाइपलाइनद्वारे पाणी आणून छोटे-मोठे तलाव, बंधारे व नालाबंडिंग भरून देण्यात यावे. गोदावरी महामंडळाच्या आंदोलनात महिलांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे या पाणी आंदोलनातही महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अंबरनाथ बर्डे, माणिक गर्जे, जगन्नाथ गावडे, शाहू खंडागळे, जगन्नाथ गायकवाड, ज्ञानेश्वर रसाळ, शाहदेव खेडकर, भाऊसाहेब सातपुते व हर्षदाताई काकडे यांनीही बैठकीत आपली भूमिका मांडत जायकवाडीच्या पाण्यासाठी एकजूट करण्याची गरज व्यक्त केली. शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील शेती व गावांच्या पाणीप्रश्नासाठी सर्वांनी एकत्रितपणे शासनाकडे पाठपुरावा करून आवश्यकता भासल्यास तीव्र आंदोलन उभारावे, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

काकडे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही पाण्याचा प्रश्न मांडण्यात आला आहे. अजित पवार, खा. शरदचंद्र पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडेही हा प्रश्न प्राधान्याने मांडला जाणार आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी मात्र या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. पक्ष कोणताही असो, पाण्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांसोबत पाणीप्रश्नावर आमनेसामने खुली चर्चा करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘पाथर्डीला निवडणुकीच्या वेळी मोठे केले जाते; मात्र आम्हाला जायकवाडीचे हक्काचे पाणी द्या,’ अशी मागणी करत काकडे यांनी राजकीय नेतृत्वाला लक्ष्य केले. ‘हक्काचे पाणी मिळविण्यासाठी आता कसे पाणी येत नाही, ते भविष्यात पाहू,’ असा इशाराही त्यांनी दिला. बैठकीत ‘पाणी आमच्या हक्काचे, कोणाच्या बापाचे नाही!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कॉ. आबासाहेब काकडे यांनी हक्काच्या पाण्यासाठी उभारलेला लढा पुढेही कायम ठेवून आबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवकांसह सर्वांनी एकजूट करावी, असे आवाहन करण्यात आले.

३२ गावांसाठी पाण्याची मागणी

बोधेगाव, बालमटाकळी, गायकवाड जळगाव, सुकळी, कांबी, शेकटे बुद्रुक, मुरमी, लाडजळगाव, गोळेगाव, दिवटे, नागलवाडी, कोनोशी, राणेगाव, अधोडी, शोभानगर, सोनविहीर, सुळेपिंपळगाव, चेडेचांदगाव, अंतरवाली खुर्द, अंतरवाली बुद्रुक, थाटे, वाडगाव, बेलगाव, प्रभूवाडगाव, लखमापुरी, शिंगोरी आदींसह ३२ गावांतील तलाव, बंधारे, नालाबंडिंग व पाणलोट क्षेत्र जायकवाडीच्या पाण्याने भरून देण्याची मागणी करण्यात आली. १९७५ मध्ये चापडगाव येथे झालेल्या सर्वपक्षीय पाणी परिषदेतून सुरू झालेल्या पाणी लढ्याची आठवण करून देत, त्याच परंपरेने आता नव्या पिढीने पाण्यासाठी संघर्ष उभारण्याचे आवाहन करण्यात आले. ‘जोपर्यंत हक्काचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष कायम राहील,’ असा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीस शिवाजीराव काकडे, हर्षदाताई काकडे, जगन्नाथ गावडे, राम अंधारे, मोहनराव कंठाळे, विश्वनाथ कुढेकर, भाऊसाहेब घोरतळे, भास्कर मासाळकर, विठू काजळे, भगवान बोडके, राम घोरतळे, राम पोटफोडे, अशोक ढाकणे, राठोड यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी, शेतकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले, तर भागवत भोसले यांनी आभार मानले.

Share This Article
Exit mobile version