लोणारमध्ये दुचाकी चोरीचा छडा; २० वर्षीय आरोपीला अटक

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा पाठलाग; पाच दुचाकींसह १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोणार (वाजिद खान) : दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना लोणार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेत त्याला थरारक पाठलागानंतर अटक केली. अर्जुन बबन राठोड (वय २०, रा. देऊळगाव कुंडपाळ, ता. लोणार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत १ लाख ५३ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

देऊळगाव कुंडपाळ येथील प्रकाश किसन सरकटे यांनी शेतात उभी केलेली हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी (क्र. एमएच-२८-बीएस-५६७१) ३० ऑगस्ट रोजी दुपारी चोरीला गेली होती. याप्रकरणी लोणार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५६/२०२६ दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान लोणार-मंठा मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करण्यात आली. लोणार-तळणी रस्त्यावरील पेट्रोलपंपाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीची दुचाकी घेऊन जाणारा संशयित आढळून आला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता तो मंठा-उसवद मार्गावर आढळला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू करताच आरोपीने रस्ता सोडून शेताकडे धाव घेतली. पोलिसांनी सुमारे तीन ते चार किलोमीटर त्याचा पाठलाग केला. अखेर मंठा तालुक्यातील मुरुमखेडा शिवारात स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपीची चौकशी केली असता लोणार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी तीन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीकडून तीन स्प्लेंडर प्लस, एक एचएफ डिलक्स आणि एक बजाज सीटी हंड्रेड अशा एकूण पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यातील तीन दुचाकींवर नोंदणी क्रमांक नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश सदगिर व सहायक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे यांच्या पथकाने केली. कारवाईत संजय जाधव, नितीन खराडे, अनिल शिंदे, गणेश तामसकर, तेजराव भोकरे, गणेश लोढे, सुनील गाडे आणि नीता शिंदे यांनी सहभाग घेतला.

Share This Article
Exit mobile version