लोणार सरोवरालगतच्या देवस्थानच्या जमिनीच्या भूसंपादनात मोठ्या गैरप्रकाराचा आरोप

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

-९८.७ एकर जमिनीच्या फेरफाराची चौकशी करण्याची मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांकडे मागणी; बेकायदेशीररीत्या वितरित केलेली मोबदला रक्कम वसूल करण्याची राजेश मापारी यांची मागणी

लोणार (वाजिद खान) : लोणार सरोवर संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तसेच देवस्थानांच्या देखभाल व संवर्धनासाठी देण्यात आलेल्या सुमारे ९८.७ एकर जमिनीच्या मोजदाद, फेरफार आणि मोबदला वाटप प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष राजेश मापारी यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून भूसंपादन प्रक्रियेत बेकायदेशीररीत्या वितरित करण्यात आलेला मोबदला शासनाच्या तिजोरीत जमा करावा, तसेच दोषी अधिकारी व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी लोणार येथील राजेश श्रीराम मापारी यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

मापारी यांनी ३० मार्च २०२६ रोजी महसूल मंत्र्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उपविभागीय अधिकारी, मेहकर यांनी २७ मे २०२६ रोजी नोटीस बजावून संबंधितांकडून खुलासा मागविला होता. त्यावर अर्जदाराने आपले म्हणणे आणि आवश्यक कागदपत्रांसह उत्तर सादर केले. मात्र, अद्याप तक्रारीची कोणतीही शहानिशा अथवा लेखी आदेश काढण्यात आलेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

देवस्थानच्या ९८.७ एकर जमिनीचा दावा

निवेदनानुसार, लोणार येथील ‘श्री गंगा भोगावती धारातीर्थ विरज क्षेत्र, लोणार’ या धर्मादाय संस्थेची नोंद धर्मादाय आयुक्त, अमरावती विभाग यांच्या कार्यालयात आहे. नारायण जयराम मोहरील यांनी सन १९५८ मध्ये संबंधित जमीन ट्रस्टला दिली होती. या जमिनीच्या उत्पन्नातून लोणार सरोवर परिसरातील हिंदू देवस्थानांची पूजा-अर्चा, रंगरंगोटी तसेच देखभाल-संवर्धन करण्याचा उद्देश असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय महादू सावजी साळुंके ट्रस्टकडील १२.२६ एकर जमीन संबंधित संस्थेला देण्यात आल्याचेही अर्जात नमूद आहे. या दोन्ही ट्रस्टच्या जमिनी मिळून सुमारे ९८.७ एकर जमीन देवस्थानच्या कार्यासाठी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

महसूल नोंदीतील फेरफारावर आक्षेप

सन १९६०-६१ च्या सुमारास ट्रस्टच्या व्यवस्थापनासाठी जमीन काही कास्तकारांना वार्षिक ठोक्याने देण्यात येत होती. कालांतराने मूळ ट्रस्टींचे निधन झाल्यानंतर काही जमीन वहितदारांच्या ताब्यात राहिली. त्यानंतर संबंधित जमिनींच्या महसूल नोंदीत काही कास्तकारांनी स्वतःच्या नावे फेरफार करून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार, आवश्यक कुळकायदा आदेश व सक्षम पुरावे नसताना संबंधित जमिनी काही व्यक्तींच्या नावे महसूल दप्तरी नोंदविण्यात आल्या. त्यामुळे मागील ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीतील सर्व महसूल व जमीनविषयक नोंदींची तपासणी करून सध्याच्या मालकी हक्काची कायदेशीर शहानिशा करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शासनाने मोबदला देण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख

लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी सरोवरालगतच्या जमिनी अधिग्रहित करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले असून, संबंधित जमीनमालकांना मोबदला देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, तक्रारीनुसार चौकशी न करता महसूल नोंदीतील नावांच्या आधारे काही व्यक्तींना मोबदला देण्यात आला. अर्जदाराने असा आरोप केला आहे की, चुकीच्या पद्धतीने तयार झालेल्या नोंदींच्या आधारे मोबदला वितरित झाला असल्यास शासनाच्या तिजोरीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वितरित झालेल्या मोबदल्याची चौकशी करून तो बेकायदेशीर ठरल्यास संबंधितांकडून वसूल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

५० वर्षांतील महसूल नोंदी तपासण्याची मागणी

संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी मागील ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीतील सर्व फेरफार नोंदी, महसूल अहवाल, ७/१२ उतारे, मालकी हक्काच्या नोंदी आणि संबंधित आदेश तपासावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच देवस्थानच्या नावावर असलेली जमीन पुन्हा कायदेशीररीत्या निश्चित करून तिचा मोबदला शासनामार्फत जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या नावे जमा करावा आणि शासनाच्या परवानगीने त्या निधीतून लोणार सरोवरालगतच्या धार्मिक स्थळांचे सौंदर्यीकरण व विकास करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणात भूसंपादन अधिकारी, मेहकर यांनी तक्रारीची सखोल शहानिशा न करता कारवाई केली नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी व संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा लोणार सरोवर संवर्धनासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा राजेश मापारी यांनी दिला आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूल मंत्री, महसूल सचिव तसेच विभागीय आयुक्त, अमरावती यांना देण्यात आल्या आहेत.

Share This Article
Exit mobile version