मानवी देहाला विचारांची गरज; ते विचार साधूसंत देत असतात : मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-श्रीमज्जगद्गुरु पलसिद्ध महास्वामीजींच्या ९६८ व्या स्मृती महोत्सवाची महाप्रसादाने सांगता; लाखो भाविकांची उपस्थिती

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : मानवी जीवनातील अंधकार आणि अहंकार नाहीसा करायचा असेल, तर मानवी देहाला विचारांची गरज आहे. हे विचार साधूसंत देत असतात. त्यासाठी गुरूचरणी नतमस्तक होऊन विचारांची शिदोरी घेऊन चालण्याची सवय झाली पाहिजे, असे प्रबोधन मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले.

श्री क्षेत्र साखरखेर्डा येथे श्रीमज्जगद्गुरु पलसिद्ध महास्वामीजी यांचा ९६८ वा स्मृती महोत्सव तीन दिवसीय भरगच्च कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवासाठी लाखो भाविकांनी उपस्थिती लावली. बुधवार, २ सप्टेंबर रोजी महोत्सवाची सांगता झाली. समारोपप्रसंगी ‘गुरुप्रसादाची चोरी’ या अभंगावर कीर्तन झाले. त्यानंतर मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वचनाने महोत्सवाची सांगता करण्यात आली. मानवी जीवन जगत असताना मानवी देहाचे कल्याण व्हावे, हा जीव ‘जीव’ न राहता ‘शिव’ व्हावा, असा मार्ग साधूसंत दाखवतात. त्यासाठी साधन म्हणून सद्गुरूचा प्रसाद महत्त्वाचा आहे. सद्गुरूशिवाय मानवी देहाचे कल्याण होऊ शकत नाही. त्यामुळे सद्गुरूच्या प्रसादाने कार्यक्रमाची सांगता करणे ही भारतीय परंपरा असल्याचे महाराजांनी सांगितले. जगामध्ये सर्वपूजनीय किंवा सर्वप्रिय व्यक्ती होण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा अलंकार म्हणजे नम्रता. ज्या साधकाजवळ नम्रता आहे, तो जगमान्य व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखला जातो. मानवी देह म्हटल्यानंतर त्याला नानाविध प्रकारचे विकार जडतात. हे विकार माणसाला माणूस म्हणून जगू देत नाहीत. माणसाला माणसापासून दूर करण्यास कारणीभूत ठरणारे हे विकार असून, त्या षड्विकारांचा बाप म्हणजे अहंकार होय.

अहंकारामुळे ना जीव खऱ्या अर्थाने माणूस होतो, ना सज्जन, ना संत आणि ना देव. अहंकारामुळे माणूस राक्षसी प्रवृत्तीच्या मार्गावर जाऊ शकतो. त्यामुळे या जीवाला विचारांची गरज आहे आणि विचार देण्याचे काम साधूसंत करतात. साधूसंतांचे विचार ग्रहण करण्यासाठी अशा पवित्र तीर्थक्षेत्री सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. सद्गुरूकडून मिळालेले ज्ञान माणसातील अहंकार नष्ट करून याच मानवी देहात देवत्वाची प्राप्ती करून देणारे असते. त्यामुळे सर्वांनी देवत्वाच्या मार्गावर चालले पाहिजे. देवत्वाकडे जाण्यासाठी संतांचा सहवास आणि संतसंगती अत्यंत महत्त्वाची आहे. ‘संतसंग ज्यांना लाभला, तिन्ही लोकी मान्य झाला; धन्य धन्य ती संगती,’ या संतवचनाप्रमाणे मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने संतविचारांची जोड मिळाली पाहिजे.

ज्या देवाने शिवभक्त रावणाला धन, ज्ञान आणि शक्तीने संपन्न केले होते, तोच रावण केवळ अहंकारामुळे उध्वस्त झाला. त्यामुळे अहंकार हा माणसाच्या विनाशाचे कारण आहे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, हीच शिकवण संत देतात. संतांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे, असे आवाहनही सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले. दरम्यान, तीन दिवसीय स्मृती महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध गावांतील महिला सेवाधारी, भाविक, नवतरुण, पुरुष मंडळी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतानाही संपूर्ण कार्यक्रमाचे शिस्तबद्ध व नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले. विविध जबाबदाऱ्या पार पाडताना महिला, पुरुष, तरुण आणि तरुणींनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले. या सर्वांच्या सहकार्यामुळे श्रीमज्जगद्गुरु पलसिद्ध महास्वामीजींचा ९६८ वा स्मृती महोत्सव भक्तिमय, आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

Share This Article
Exit mobile version