राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : रविकांत तुपकर

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

-क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; राज्य शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

बुलढाणा (सुरेश हुसे) : संकटे जणू शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. कधी आसमानी, तर कधी सुलतानी संकटांनी शेतकरी पिचला जात आहे. सध्या बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्य शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, युवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे, मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासह राज्यस्तरीय शिष्टमंडळाने आज, २ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे राज्यात निर्माण झालेली विदारक परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देत कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले.

यावेळी चर्चा करताना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अत्यंत गंभीर संकटातून जात आहे. चालू खरीप हंगामात अनेक भागांत पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना आवश्यक पाणी मिळत नाही. परिणामी सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर, मका यांसह विविध खरीप पिके पाण्याअभावी वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पिकांची वाढ खुंटली असून पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत आणि इतर शेती खर्चासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिके हातातून जाण्याचे आणखी मोठे संकट उभे ठाकले आहे. दोन दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास संपूर्ण पिके नष्ट होऊन खरीप हंगाम हातातून जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकरी पुरते खचले असून त्यांच्यावर मानसिक व आर्थिक ताण निर्माण झाला आहे. पिकांची आणि शेतकऱ्यांची ही गंभीर अवस्था पाहता शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्य शिष्टमंडळाच्या वतीने यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यासह पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झालेल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा, महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव आर्थिक मदत द्यावी, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची पीक कर्जे व शेतीशी संबंधित कर्जांना तातडीने स्थगिती देऊन कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत देऊन शेतीपंपांना नियमित वीजपुरवठा करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. पिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने सिंचनाचे नियोजन, जलसाठ्यांचा वापर आणि आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने मंजूर करून वितरित करावी, जनावरांसाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करावीत, शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी मोफत अथवा अनुदानित बियाणे, खते व आवश्यक कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, अशाही मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.

पावसाअभावी शेतकऱ्यांवर निर्माण झालेला आर्थिक व मानसिक ताण लक्षात घेऊन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदत व समुपदेशन यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी पूर्ववेळ वीज उपलब्ध करून द्यावी, तसेच जळालेले ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदलून द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. या मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी ‘क्रांतिकारी’चे नेते अमोल मोरे, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, उपसरपंच तथा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे युवा नेते हनुमान मिसाळ, ॲड. प्रवीण सुरडकर, सुनील मिसाळ, नितीन सोनटक्के, निलेश राजपूत, रामेश्वर अंभोरे, श्रीराम चलवाड, विठ्ठल खेडेकर, हरिभाऊ उबरहांडे, भागवत धोरण, अरबाज खान, पवन काकडे, हर्षल गवते यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version