बुलढाणा जिंकले! विद्याधर महाले यांचा वाढदिवस अभूतपूर्व शक्तिप्रदर्शनाने साजरा!

admin Add a Comment 5 Min Read
5 Min Read

– ‘पाठीवर वार करण्यापेक्षा हिंमत असेल तर समोरून लढा!’; आ. श्वेताताई महाले यांनी बुलढाण्यात येऊन ललकारले!
– वाढदिवसाच्या जंगी शक्तिप्रदर्शनात वीजपुरवठा खंडित झाल्याने आ. श्वेताताई महाले आक्रमक!
– बुलढाण्यात शेकडो जेसीबींमधून पुष्पवृष्टी; तरुणाईसह हजारो बुलढाणेकरांची तुफान गर्दी!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव तथा राज्य सरकारच्या मंत्रालयातील सहसचिव दर्जाचे वरिष्ठ अधिकारी विद्याधर महाले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने महाले दाम्पत्याने केवळ जोरदार शक्तिप्रदर्शनच केले नाही, तर जिल्ह्यातील राजकीय वातावरणही ढवळून काढले. जयस्तंभ चौकात मिरवणूक आली असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने भाजपच्या आमदार श्वेताताई महाले यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ‘चिखली आणि बुलढाण्याची जनता हुकूमशाही सहन करणार नाही,’ असा घणाघात करत त्यांनी चिखलीत येऊन खुमखुमी दाखवणाऱ्या बुलढाण्यातील संबंधित नेतृत्वाला बुलढाण्यात येऊन खुले आव्हान दिले. शेकडो जेसीबींमधून पुष्पवृष्टी करत त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी हजारो तरुणांसह मोठ्या संख्येने बुलढाणेकरांची तुफान गर्दी झाली होती.

मंगळवारी (१ सप्टेंबर) विद्याधर महाले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धाड नाका ते सहकार विद्या मंदिर अशी भव्य रॅली काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि संगीताच्या तालावर थिरकणारे हजारो कार्यकर्ते यामुळे बुलढाणा शहर दणाणून गेले. या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते शेकडो ‘जेसीबीं’च्या माध्यमातून करण्यात आलेली पुष्पवृष्टी. फुलांनी न्हाऊन निघालेले विद्याधर महाले पाटील आणि रस्त्याच्या दुतर्फा लोटलेला जनसागर यामुळे या वाढदिवसाचे रूपांतर एका मोठ्या शक्तिप्रदर्शनात झाले. सहकार मंदिराच्या सभागृहात पोहोचल्यानंतर या रॅलीचे भव्य अभिष्टचिंतन सोहळ्यात रूपांतर झाले. हा सोहळा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होता.

या जल्लोषाला अचानक राजकीय वादाची किनार लाभली. मिरवणूक बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात पोहोचली असता, महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन करत असतानाच अचानक वीजपुरवठा खंडित झाला. हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा संशय व्यक्त करत आमदार श्वेताताई महाले प्रचंड संतप्त झाल्या. त्यांनी अंधारातच हातात माईक घेतला आणि स्थानिक विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

‘तुम्हाला जे लढायचं आहे ते समोर येऊन लढा, पाठीमागून असे प्रकार करू नका. चिखली आणि बुलढाण्याची जनता अशी हुकूमशाही कधीच सहन करणार नाही,’ असा सज्जड इशारा श्वेताताई महाले यांनी दिला. बुलढाण्यात येऊन आ. श्वेताताई महाले यांनी दम भरल्याने संबंधित विरोधी नेत्याची पायाखालची वाळू सरकल्याची चर्चा सुरू होती. यावेळी त्यांनी एक सूचक शेर म्हटला,

“जख्म पर जख्म लगाना तेरा अच्छा है क्या?
आँख सूरज को दिखाना तेरा अच्छा है क्या?
तुझ में हिम्मत है तो लड़ सामने आकर बुज़दिल,
पीठ पर तीर चलाना तेरा अच्छा है क्या?”

वाढदिवसाच्या निमित्ताने रंगलेला हा राजकीय कलगीतुरा आणि ‘जेसीबीं’मधून झालेली फुलांची उधळण सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. महाले दाम्पत्याने बुलढाण्यात केलेले राजकीय शक्तिप्रदर्शन हे आगामी काळात बुलढाण्याची जागा जिंकल्यात जमा असल्याचे द्योतक ठरले आहे.

तुफान गर्दी, तुफान जल्लोष, बुलढाण्यात अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन.

जनतेच्या अथांग प्रेमाचे अभूतपूर्व प्रदर्शन; बुलढाणेकर स्वयंस्फूर्तीने लोटले!

१ सप्टेंबर रोजी विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात जनसागराचा महापूर पाहायला मिळाला. कोणत्याही मोठ्या प्रसिद्धीशिवाय आणि सक्तीशिवाय, बुलढाण्यातील सर्वसामान्य नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेतृत्वावर प्रेमाचा वर्षाव केला. सहकार विद्या मंदिराचा परिसर जनसमुदायाने अक्षरशः ओसंडून वाहत होता. ३० ते ४० जेसीबी, क्रेन, ढोल-ताशांच्या गजर आणि भव्य शोभेच्या फटाक्यांच्या आतषबाजीत बुलढाणेकरांनी हा वाढदिवस एका मोठ्या उत्सवासारखा साजरा केला. शासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि समाजघटकातील ५० हजारांहून अधिक लोक स्वतःहून शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले होते. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे शहरात एक वेगळीच दिशा आणि ऊर्जा पाहायला मिळाली.


सामाजिक भान आणि विकासाचा सुगंध

हा केवळ वाढदिवस नव्हता, तर बुलढाण्याच्या विकासाचा आणि विश्वासाचा उत्सव होता. संकट काळात नेहमीच धावून येणारे नेतृत्व म्हणून महाले दाम्पत्याच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहिली. चिखलीसह बुलढाणा परिसरात झालेला विकास आणि प्रशासकीय कामांचा “सुगंध” आज संपूर्ण जिल्ह्यात पसरला आहे. या विकासात्मक कामांमुळेच सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि कार्यकर्त्यांना खरा आधार मिळाला आहे. इतकी मोठी गर्दी असूनही हजारो कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्धतेचे आणि सामाजिक भान जपल्याचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले. लाईट घालविण्याचा प्रकार घडला तरी, जनतेचा उत्साह तिळमात्र कमी झाला नाही. बुलढाणेकरांनी कुठल्याही कृत्रिम दबावाला बळी न पडता, मनापासून उपस्थित राहून दाखवून दिले की जनतेच्या मनात नेमके कोणाचे स्थान आहे. बुलढाण्याच्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी आपल्या अभूतपूर्व उपस्थितीने स्पष्ट संदेश दिला आहे—”विश्वास विकत घेता येत नाही, तो कमावावा लागतो!”

Share This Article
Exit mobile version