सर्वसामान्यांचे असामान्य अधिकारी व्यक्तिमत्त्व : श्री. विद्याधरजी महाले साहेब!

admin Add a Comment 7 Min Read
7 Min Read

– विष्णु आव्हाळे

वेळ बदलत राहते आणि वेळेसोबत परिस्थिती, माणसे आणि जबाबदाऱ्याही बदलत जातात. मात्र, परिस्थिती कितीही बदलली तरी आपल्या ध्येयाशी, कर्तव्याशी आणि माणुसकीशी प्रामाणिक राहणारी व्यक्तिमत्त्वे समाजाच्या मनात कायमची घर करून जातात. प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर पोहोचूनही पदाचा रुबाब न मिरवता, अधिकारांचा गर्व न बाळगता सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी आपली नाळ जोडून ठेवणारे श्री. विद्याधरजी महाले साहेब हे अशाच असामान्य व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.

राज्याच्या मंत्रालयीन आणि प्रशासकीय वर्तुळात विद्याधर महाले हे एक महत्त्वाचे आणि वजनदार नाव आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कार्यक्षमतेचा आणि कर्तव्यनिष्ठेचा ठसा उमटविला आहे. कोणतेही काम असो, ते तत्परतेने मार्गी लावण्याची वृत्ती, रोखठोक पण शालीन संवाद, समोरच्या व्यक्तीची अडचण समजून घेण्याची संवेदनशीलता आणि वागण्यातला नम्रपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष गुण आहेत. मोठ्या पदावर गेल्यानंतर अनेकांच्या वागण्यात बदल होतो. पदाचा प्रभाव आणि अधिकारांचा भार त्यांच्या वर्तनातून जाणवू लागतो. मात्र विद्याधर महाले याला अपवाद ठरतात. त्यांच्यासाठी पद म्हणजे केवळ अधिकार उपभोगण्याचे साधन नाही, तर सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी आहे. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर राज्यपातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्या संधीचा उपयोग अधिकाधिक लोकोपयोगी आणि विधायक कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी झाला पाहिजे, ही त्यांची भूमिका त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येते. मंत्रालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी आपापले काम आटोपून बाहेर पडतात. मात्र मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाच्या परिसरात असलेली विद्याधर महाले यांची केबिन अनेकदा रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. घड्याळाचा काटा रात्री साडेनऊच्या दिशेने सरकत असतानाही कामात मग्न असलेले महाले साहेब हे दृश्य त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची जाणीव करून देते. ही एखाद्या दिवसाची बाब नाही. कामानिमित्त मंत्रालयात येणाऱ्यांना अनेकदा हा अनुभव येतो. दिवसभराच्या धावपळीनंतरही काम पूर्ण होईपर्यंत केबिनमध्ये थांबण्याची त्यांची कार्यशैली निश्चितच प्रेरणादायी आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून लोकप्रतिनिधी आणि नागरिक आपल्या प्रश्नांसाठी त्यांच्याकडे येत असतात. त्यांच्या केबिनबाहेर लागलेली रांग हीच त्यांच्या जनसंपर्काची आणि विश्वासाची साक्ष असते. एक व्यक्ती आत गेल्यानंतर दुसरी, दुसरीनंतर तिसरी व्यक्ती; अशा पद्धतीने दिवसभर भेटीगाठी सुरू असतात. प्रत्येकाची अडचण ऐकून घेणे, प्रश्नाची वस्तुस्थिती समजून घेणे आणि संबंधित विभागाशी समन्वय साधून तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांची कार्यपद्धती आहे. दिवसभरात किती फोन येत असतील, किती लोकांच्या अडचणी ऐकाव्या लागत असतील, याला खरोखरच मर्यादा नसते; मात्र या सर्व धावपळीतही संयम आणि कामावरील निष्ठा कायम ठेवणे हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे. त्यांच्या जीवनातील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई ते चिखली हा सातत्यपूर्ण प्रवास. सोमवार ते शुक्रवार मंत्रालयीन जबाबदारी पार पाडल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी मुंबईहून रेल्वेने जालना गाठायचे आणि तेथून पुन्हा सुमारे ८६ किलोमीटरचा प्रवास करून चिखली गाठायचे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठी, बैठका, विविध प्रश्नांचा आढावा आणि अडचणी सोडविण्यासाठी देत पुन्हा रविवारी मुंबईच्या दिशेने निघायचे आणि सोमवारपासून मंत्रालयीन कामकाजाला सुरुवात करायची. हा दिनक्रम काही दिवसांचा किंवा महिन्यातील एखाद्या सप्ताहाचा नसून अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. एवढा व्यस्त दिनक्रम सांभाळण्यासाठी केवळ पद पुरेसे नसते; त्यासाठी ध्येयवेड, प्रचंड इच्छाशक्ती आणि जनतेसाठी काहीतरी करण्याची तळमळ आवश्यक असते.

विशेष म्हणजे, राजकीय वातावरणाच्या जवळ राहूनही अधिकारी म्हणून असलेल्या आपल्या भूमिकेची जाणीव त्यांनी कायम ठेवली. पत्नीच्या राजकीय वाटचालीत आधारभूत भूमिका बजावत असताना त्यांनी कोणतेही घटनाबाह्य सत्ताकेंद्र निर्माण केले नाही. राजकारण आणि प्रशासन यांच्यातील मर्यादा ओळखून स्वतःला त्या चौकटीत ठेवण्याची त्यांची भूमिका निश्चितच उल्लेखनीय आहे. अधिकार असूनही अधिकारांचे प्रदर्शन न करणे आणि जबाबदारी मोठी असूनही पाय जमिनीवर ठेवणे, ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी मंत्रालय म्हणजे अनेकदा दूरची आणि अवघड वाटणारी व्यवस्था असते. एखाद्या छोट्याशा कामासाठीही अनेक चकरा माराव्या लागतात, वेळ आणि पैसा खर्च होतो. अशा परिस्थितीत एखाद्या अधिकाऱ्याने जनतेचा प्रश्न समजून घेतला, संबंधित यंत्रणेशी योग्य समन्वय साधला आणि नागरिकांच्या अनावश्यक मंत्रालयीन चकरा वाचवल्या, तर त्यापेक्षा मोठी जनसेवा कोणती असू शकते? विद्याधर महाले यांच्या कामाची खरी ताकद याच ठिकाणी दिसून येते. टीका करणारे प्रत्येक काळात असतात. एखाद्याचे काम लोकांच्या हिताचे असेल तरी त्याला विरोध करणारे आवाज उठतातच. मात्र जनतेच्या मनात निर्माण झालेला विश्वास कोणत्याही टीकेपेक्षा मोठा असतो. लोकांच्या अडचणीच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणारा माणूस लोकांच्या स्मरणात राहतो. महाले साहेबांच्या बाबतीतही हीच भावना प्रकर्षाने जाणवते.

स्वप्न पाहणे सोपे असते; पण त्या स्वप्नांना वास्तवात उतरविण्यासाठी आयुष्य झोकून देणे कठीण असते. स्वतःच्या कर्तृत्वातून मिळालेल्या संधीचा उपयोग समाजासाठी करणे, हीच खरी नेतृत्वाची कसोटी आहे. विद्याधर महाले यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत ही कसोटी सातत्याने पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ एका अधिकाऱ्यापुरते मर्यादित राहत नाही, तर सर्वसामान्यांच्या अपेक्षा आणि विश्वासाचे प्रतीक बनते. वाढदिवस हा प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस असतो. मात्र ज्यांचे प्रत्येक दिवस इतरांच्या अडचणी सोडविण्यात, जनतेसाठी धावपळ करण्यात आणि कर्तव्य बजावण्यात जातात, त्यांच्या आयुष्यात प्रत्येक दिवसच एका अर्थाने उत्सव असतो. त्यामुळे विद्याधर महाले साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केवळ दीर्घायुष्याची कामना करणे पुरेसे नाही, तर जनसेवेची त्यांची ही वाटचाल अशीच अविरत सुरू राहावी, त्यांच्या हातून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी अधिकाधिक विधायक आणि लोकोपयोगी कामे घडावीत, हीच मनापासून अपेक्षा.

पद मोठे असणे ही मोठेपणाची निशाणी नाही; त्या पदावर राहून आपण किती माणसे जोडली, किती प्रश्न सोडवले आणि किती लोकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला, यावर व्यक्तिमत्त्वाची खरी उंची ठरते. विद्याधर महाले साहेबांनी आपल्या कर्तृत्वातून ही उंची गाठली आहे. म्हणूनच ते केवळ प्रशासकीय अधिकारी नाहीत, तर सर्वसामान्यांच्या सुख-दुःखाशी नाळ जोडलेले एक असामान्य अधिकारी व्यक्तिमत्त्व आहेत. साहेब, जनतेसाठीची आपली तळमळ अशीच कायम राहो, आपल्या कर्तृत्वाची आणि कार्यक्षमतेची उंची दिवसेंदिवस वाढत राहो, जनहितासाठी आपल्या हातून अविरतपणे विधायक कार्य घडत राहो आणि आपल्या कार्याला जनतेचा आशीर्वाद सदैव लाभत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा. आपण शतायुषी व्हा; कारण काही व्यक्तींचा जन्म केवळ स्वतःसाठी नसतो, तर समाजासाठी, जनतेसाठी आणि लोककल्याणासाठी असतो!

(स्वीय सहाय्यक, विद्याधर महाले साहेब)

Share This Article
Exit mobile version