-हिंसेकडून अहिंसेकडे वाटचाल, युवकांना सकारात्मक दिशा अन् व्यसनमुक्तीसाठी व्यापक जनजागृतीची गरज
जालना (सुरेश हुसे) : शहरात खून, मारामाऱ्या, चोरी, लुटमार, आत्महत्या यांसारख्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केवळ कायद्याचा धाक पुरेसा नसून अहिंसा, संस्कार, कौटुंबिक संवाद, मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती आणि सामाजिक प्रबोधन या सर्व आघाड्यांवर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. तथागत गौतम बुद्धांचा शांतता व अहिंसेचा विचार कृतीत उतरवून ‘हिंसामुक्त जालना, सुरक्षित जालना’ ही व्यापक सामाजिक चळवळ उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल बनसोडे यांच्या पुढाकारातून ३० ऑगस्ट रोजी टाऊन हॉलजवळील तिरुपती प्लाझा येथील प्लॅनेट फिटनेस क्लबमध्ये ‘हिंसामुक्त जालना, सुरक्षित जालना’ या संकल्पनेवर विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समाजशास्त्रज्ञ, कायदेतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, मनोविकारतज्ज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक, मुख्याध्यापक, समुपदेशक, प्राध्यापक, माध्यम प्रतिनिधी आणि सुजाण नागरिकांनी बैठकीत सहभाग घेतला.
हिंसेकडून अहिंसेकडे वाटचाल हवी
यावेळी डॉ. राजेंद्र गाडेकर म्हणाले की, मानवी मनातील राग, लोभ, मत्सर, हेवा, द्वेष, ईर्षा आणि तिरस्कार यांसारख्या विकारांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. तथागत गौतम बुद्धांनी मनातील विकारांवर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग दाखविला आहे. मनावर नियंत्रण मिळविल्यास हिंसक प्रवृत्तींवरही नियंत्रण मिळविणे शक्य आहे. त्यामुळे व्यक्तीच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासोबतच समाजात शांतता आणि अहिंसेची मूल्ये रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. व्यसनाधीनता, मानसिक ताण, बेरोजगारी, चुकीची संगत आणि सोशल मीडियावरील नकारात्मक प्रभाव यामुळे काही युवक गुन्हेगारीकडे वळू शकतात. त्यामुळे युवकांना योग्य दिशा देण्यासाठी कुटुंब, शाळा, समाज आणि प्रशासनाने एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. गुन्हेगारीविरोधातील लढा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून प्रत्येक सुजाण नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, असे आवाहन डॉ. गाडेकर यांनी केले.
कुटुंबातील संवाद हरवला तर तरुणाई भरकटते
प्रा. सुभाष देठे यांनी गुन्हेगारीमागील सामाजिक आणि कौटुंबिक कारणांकडे लक्ष वेधले. आर्थिक अडचणी, बेरोजगारी, कौटुंबिक वातावरण, संवादाचा अभाव, उपेक्षा आणि नैराश्य यांचा युवकांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधून त्यांना प्रेम, आपुलकी, कौतुक आणि योग्य मार्गदर्शन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबात मुलांच्या भावनिक गरजा समजून घेतल्या गेल्या आणि त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या गेल्या, तर अनेक समस्या सुरुवातीच्या टप्प्यावरच सोडविता येऊ शकतात. त्यामुळे पालकांनी केवळ मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे न पाहता त्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासाकडेही लक्ष द्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शाळेतूनच नैतिक मूल्यांची पेरणी आवश्यक
सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल बनसोडे यांनी शिक्षक, पालक आणि शाळांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी शालेय स्तरापासूनच प्रयत्न करणे आवश्यक आहे. बाल मानसशास्त्र, समुपदेशन आणि वाचन संस्कृतीला चालना देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना केवळ गुण आणि स्पर्धेच्या चौकटीत न पाहता त्यांच्यात संवेदनशीलता, सहकार्य, संयम, शिस्त आणि इतरांविषयी आदराची भावना निर्माण करण्यासाठी शाळांनी विविध उपक्रम राबवावेत. युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला सकारात्मक दिशा मिळाल्यास भविष्यातील सामाजिक समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
कायद्याचा धाक आणि प्रभावी अंमलबजावणी गरजेची
अॅड. संजय वैद्य यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. तपासातील त्रुटी, कायदेशीर प्रक्रियेतील विलंब आणि कायद्याचा धाक कमी झाल्याची भावना निर्माण झाल्यास त्याचा गुन्हेगारीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासोबतच नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि समाजप्रबोधन करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुन्हे घडण्यापूर्वीच त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद व समन्वय वाढविण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष नको
मानसशास्त्रज्ञ डॉ. गजानन खरात यांनी गंभीर मानसिक समस्यांना सामोरे जाणाऱ्या व्यक्तींचा वेळीच शोध घेऊन त्यांना समुपदेशन आणि आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या लपविण्याऐवजी त्यावर मोकळेपणाने चर्चा होणे आवश्यक आहे. योग्य वेळी मदत मिळाल्यास अनेक गंभीर परिस्थिती टाळता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. मानसशास्त्रीय अभ्यासक राहुल पाखरे यांनी बेरोजगारी, आर्थिक अस्थिरता आणि सोशल मीडियावरील चुकीच्या आदर्शांचा युवकांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम स्पष्ट केला. तर समुपदेशक किशोर आघाम यांनी कौटुंबिक संवाद आणि भावनिक बुद्धिमत्ता वाढविण्यावर भर दिला.
गुन्हेगारांचे उदात्तीकरण टाळा
डॉ. प्रशांत आढावे यांनी गुन्हेगारी करणाऱ्या व्यक्तीचे सामाजिक उदात्तीकरण टाळण्याची गरज व्यक्त केली. चुकीच्या कृत्यांना प्रतिष्ठा मिळाल्यास त्याचा युवकांवर अनुकरणात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गुन्हेगारीला सामाजिक मान्यता न देता युवकांसमोर सकारात्मक आदर्श निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक सतीश खरटमल यांनी समाजातील कमी होत चाललेल्या एकोप्याबद्दल चिंता व्यक्त केली. समाजात सकारात्मक विचार वाढविण्यासोबतच चांगले कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या उपक्रमांना अधिक प्रसिद्धी देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील सकारात्मक वातावरण युवकांच्या विचारविश्वावर प्रभाव टाकू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
युवकांना सकारात्मक दिशा देण्याची गरज
बैठकीत युवकांमध्ये वाढणारे व्यसन, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, बेरोजगारी, कौटुंबिक ताणतणाव आणि चुकीच्या संगतीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवरही चर्चा झाली. युवकांच्या ऊर्जेला सकारात्मक दिशा देण्यासाठी क्रीडा, वाचन, सांस्कृतिक उपक्रम, कौशल्यविकास, करिअर मार्गदर्शन आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत उपस्थित तज्ज्ञांनी व्यक्त केले. युवकांना केवळ गुन्हेगारीपासून दूर ठेवणे हा उद्देश न राहता त्यांना समाजनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या क्षमतेला योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्यांची ऊर्जा विधायक कामासाठी वापरली जाऊ शकते, असा सूर बैठकीत उमटला.
‘हिंसामुक्त जालना’साठी सर्वांनी पुढाकार घ्यावा
बैठकीस डॉ. नारायण पाझाडे, वैभव काळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. डॉ. शांताराम रायपुरे, सुभाष कोळकर आणि योग शिक्षक बालकुमार अण्णा यांनीही उपक्रमाला शुभेच्छा देत या सामाजिक चळवळीत सहभागी होण्याची भूमिका व्यक्त केली. हिंसामुक्त आणि सुरक्षित जालना घडविण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, युवकांचे समुपदेशन, व्यसनमुक्ती, कौटुंबिक संवाद, नैतिक शिक्षण आणि सकारात्मक सामाजिक वातावरण या सर्वांचा समन्वय साधणे आवश्यक आहे. ‘हिंसामुक्त जालना, सुरक्षित जालना’ ही केवळ घोषणा न राहता नागरिकांच्या सहभागातून लोकचळवळ बनली पाहिजे, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

