-इंद्रायणी नदीत श्रींच्या मूर्ती विसर्जनास बंदी कायम; गणेश मंडळ पदाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध सूचना
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आळंदी पोलिस ठाण्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने गणेश मंडळांना विविध सूचना देण्यात आल्या. यावेळी उत्सव काळात डीजेचा वापर करू नये, तसेच मिरवणुकीमध्ये लेझर व प्लाझ्माचा वापर करण्यास बंदी असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले. त्याचबरोबर इंद्रायणी नदीत श्रींच्या मूर्ती विसर्जनास असलेली बंदी कायम राहणार असल्याचेही सांगण्यात आले.


परवानगी घेणे बंधनकारक
आळंदी पंचक्रोशीतील गणेशोत्सवासाठी संबंधित गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनाची आवश्यक पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मंडळांनी उत्सवाच्या अनुषंगाने प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. गणेशोत्सव काळात पोलिस प्रशासनाकडून मंडळांना सर्वोतोपरी मदत व सहकार्य केले जाईल. मात्र उत्सव भक्तिमय, मंगलमय आणि उत्साही वातावरणात तसेच शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही यावेळी सांगण्यात आले. डीजेच्या वापरास बंदी असून ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लेझर आणि प्लाझ्माचा वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. पोलिस प्रशासनाच्या या आवाहनाला गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची ग्वाही दिली.
गणेश दर्शनासाठी स्वतंत्र रांगा
गणेशोत्सव काळात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता गणेश दर्शनासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा ठेवण्यात याव्यात, अशी सूचना करण्यात आली. मंडळांनी मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावी. गर्दीचे योग्य नियोजन करून भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे पोलिस प्रशासनाने सांगितले. गणेश मंडळांनी मंडप व परिसरात आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा, अशा सूचनाही देण्यात आल्या. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मंडळांनी पोलिस प्रशासनाशी समन्वय ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
विसर्जन मिरवणुकीसाठी मार्ग निश्चित
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी चाकण चौक, वडगाव रस्ता, मरकळ रस्ता या मार्गाने पुढे चावडी चौकातून नगरपरिषद चौक असा मार्ग राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. मात्र मिरवणुकीसाठी संबंधित मंडळांनी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असून, वेळोवेळी पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. आळंदी हे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र असल्याने गणेशोत्सव काळात भाविकांची तसेच नागरिकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता, मिरवणुकीचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था याबाबत पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. गणेश मंडळांनीही प्रशासनाला सहकार्य करून उत्सवाचा धार्मिक व सामाजिक सलोखा कायम ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.
शांतता आणि शिस्तीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन
गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीचा उत्सव असल्याने कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, याची प्रत्येक मंडळाने दक्षता घ्यावी. नागरिक, गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि भाविकांनी एकमेकांना सहकार्य करून शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा कायम ठेवावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त करून गणेशोत्सव काळात प्रशासन व गणेश मंडळांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली. बैठकीचे सुसंवाद व यशस्वी संयोजन पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे यांनी केले.

