– अवघ्या दीड वर्षापूर्वीच झाला होता सेवेत दाखल; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट, पोलिसांकडून चौकशी सुरू!
– सोमवारी रात्री कर्तव्यावर असताना पहाटे तीनच्या सुमारास एसएलआर बंदुकीतून झाडली गोळी; छत्रपती संभाजीनगर येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू!
साखरखेर्डा / छत्रपती संभाजीनगर (अशोक इंगळे/गणेश मुंढे) : येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) कॅम्पमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका २४ वर्षीय जवानाने मंगळवारी (ता. १) पहाटे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. अजय माधवराव वाकोडे (रा. गुंज, जि. बुलढाणा) असे या गंभीर जखमी झालेल्या जवानाचे नाव आहे. गोळी थेट मानेत लागल्याने त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेने गुंज गावात हळहळ व्यक्त होत आहे.
कॅम्पमधील सहकाऱ्यांनी त्याला तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, मानेला गंभीर दुखापत झाल्याने आणि रक्तस्राव जास्त झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट!
जखमी जवान अजय वाकोडे हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील गुंज येथील रहिवासी असून, सुमारे दीड वर्षापूर्वीच तो एसआरपीएफच्या सेवेत दाखल झाला होता. सेवेचा अत्यंत कमी कालावधी झालेला असताना आणि कर्तव्यावर असताना त्याने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी जवानाने आत्महत्येसाठी वापरलेली एसएलआर रायफल जप्त केली असून, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. कौटुंबिक तणाव, कामाचा ताण की अन्य काही वैयक्तिक कारण, या दृष्टीने पोलिस सर्व अंगांनी तपास करत आहेत. याप्रकरणी वाकोडे याच्यासोबत कर्तव्यावर असलेल्या सहकाऱ्यांची आणि नातेवाईकांची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

