शेतकऱ्याच्या लेकीची ऐतिहासिक गरुडझेप; पहिल्याच प्रयत्नात पहिल्याच फेरीत मुंबईच्या जे.जे.मध्ये MBBS ला निवड!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

ग्रामीण भागातील समीक्षा धुरंदर हिचे NEETमध्ये ५६३ गुण; नवोदय विद्यालयातून शिक्षण घेत मिळवले घवघवीत यश

चिखली (राजेंद्र घुबे) : जिद्द, चिकाटी आणि आई-वडिलांच्या कष्टांची जाण असेल, तर खेड्यागावातूनही थेट मुंबईतील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत झेप घेता येते, हे किन्ही सवडत येथील एका शेतकरी कुटुंबातील लेकीने दाखवून दिले आहे. उंद्री (उदयनगर)पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या किन्ही सवडत गावची रहिवासी कु. समीक्षा सहदेव धुरंदर हिने वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशासाठी घेतलेल्या NEET 2026 परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ५६३ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तिची पहिल्याच फेरीत महाराष्ट्रातील नामांकित व मानबिंदू असलेल्या ग्रँट मेडिकल कॉलेज, जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे MBBS अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.

असा आहे समीक्षा हिचा शैक्षणिक प्रवास

समीक्षाचे प्राथमिक शिक्षण उंद्री येथील सहकार विद्या मंदिरात झाले, तर माध्यमिक शिक्षण तिने जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव येथे पूर्ण केले. नवोदय विद्यालयाने तिच्या शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्त्व विकासात मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर अकरावी आणि बारावीचे शिक्षण तिने पुणे येथील दक्षिणा फाउंडेशनमध्ये पूर्ण केले. २०२६ मध्ये झालेल्या HSC परीक्षेत तिने तब्बल ९२ टक्के गुण मिळवून यश संपादन केले. त्याच वर्षी वैद्यकीय प्रवेशासाठी झालेल्या NEET परीक्षेला पहिल्यांदाच सामोरे जात तिने ५६३ गुण मिळविले आणि वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न साकार केले. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येत ग्रामीण वातावरणात शिक्षण घेऊन, त्यातही नवोदय विद्यालयासारख्या शासकीय निवासी विद्यालयातून घडत तिने मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. कोणत्याही मोठ्या शहरातील महागड्या शैक्षणिक वातावरणाचा आधार नसतानाही सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि ध्येय निश्चित करून तिने मिळविलेली ही गरुडझेप ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी यश

समीक्षाच्या या यशामुळे किन्ही सवडत, उंद्री तसेच चिखली परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी समीक्षाचे यश प्रेरणादायी ठरणार आहे. तिच्या यशामुळे नवोदय विद्यालय परिवारातही आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आई-वडिलांच्या कष्टांना यशाचे श्रेय

आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना कु. समीक्षा धुरंदर म्हणाली, “माझे आई-वडील शेतकरी आहेत. त्यांनी खूप कष्ट केले. माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या आई-वडिलांना, नवोदय विद्यालयातील माझ्या गुरुजनांना आणि दक्षिणा फाउंडेशनला देते. नवोदयने मला स्वप्न बघायला शिकवले.” समीक्षाने मिळविलेल्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन, नवोदय विद्यालयातील शिस्तबद्ध वातावरण तसेच दक्षिणा फाउंडेशनचे मार्गदर्शन यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ग्रामीण भागातून मुंबईतील प्रतिष्ठित जे.जे. मेडिकल कॉलेजपर्यंत पोहोचण्याची तिची ही वाटचाल अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून आपले भविष्य घडविण्याची प्रेरणा देणारी ठरली आहे.

Share This Article
Exit mobile version