-उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांचे गुणवंतांना आवाहन; सावंगी टेकाळे येथे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : “गावाने घडवलेल्या गुणवंत युवकांनी स्वतःचे करिअर घडविल्यानंतर आपल्या गावाकडे आणि समाजाकडेही जबाबदारीने पाहावे. एका यशस्वी व्यक्तीने एका विद्यार्थ्याला घडविले, तर आजचे ५६ गुणवंत भविष्यात शेकडो गुणवंत घडवू शकतात,” असे प्रेरणादायी आवाहन सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले.
गावाचा विकास म्हणजे केवळ रस्ते नव्हेत
“गावात रस्ते झाले, इमारती उभ्या राहिल्या किंवा घरांची संख्या वाढली म्हणजे गावाचा विकास झाला, असे नाही. गावातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा, युवकांना मिळणाऱ्या संधी आणि शिक्षणामुळे उंचावणारे जीवनमान हे गावाच्या विकासाचे खरे मापदंड आहेत,” असे प्रा. खडसे यांनी सांगितले. सावंगी टेकाळे येथील ५६ युवकांनी शिक्षक, बँक अधिकारी, एलआयसी अधिकारी, पोलीस अधिकारी यांसह विविध क्षेत्रांत आपले करिअर घडवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या यशामागे आई-वडिलांचे कष्ट, त्याग आणि संस्कारांचा मोठा वाटा असल्याचे नमूद करून प्रा. खडसे यांनी सर्व गुणवंत युवक आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.
एमपीएससीतील यशाचे कौतुक
आजच्या स्पर्धात्मक युगात स्पर्धा परीक्षांची पातळी दिवसेंदिवस कठीण होत असतानाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर यश संपादन केले आहे. एसटीआय आणि पीएसआय परीक्षेत यश मिळविणाऱ्या सावंगी टेकाळे येथील युवकांचे प्रा. खडसे यांनी विशेष कौतुक केले. “ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या बळावर ते मोठ्या पदांवर पोहोचू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून मोठी स्वप्ने पाहावीत,” असे ते म्हणाले.
‘यशानंतर गावाकडे पाठ फिरवू नका’
नोकरी किंवा मोठे पद मिळाल्यानंतर आपल्या गावाशी असलेले नाते कायम ठेवण्याचे आवाहन प्रा. खडसे यांनी केले. गावातील गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन तसेच शक्य ती आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी गावातील गुणवंत युवकांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. “आपण पुढे जाताना आपल्या मागे असलेल्या एखाद्या विद्यार्थ्याचा हात धरला, तर त्याचे आयुष्य बदलू शकते. समाजातील प्रत्येक व्यक्तीची सामाजिक जबाबदारी आहे. स्वतःच्या यशाचा उपयोग दुसऱ्याला उभे करण्यासाठी झाला, तर त्या यशाला खरा अर्थ प्राप्त होतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जि.प. शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नांची गरज
सावंगी टेकाळे येथील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत. त्यामुळे या शाळेचा शैक्षणिक दर्जा आणखी उंचावण्यासाठी ग्रामपंचायत, शिक्षक, माजी विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रा. खडसे यांनी केले. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, पुस्तकांची उपलब्धता, शैक्षणिक उपक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गावातील यशस्वी युवकांनी योगदान द्यावे. गावातील एका विद्यार्थ्याला पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली, तर भविष्यात गावातून मोठ्या संख्येने गुणवंत निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘एकमेकांचा हात धरल्याशिवाय प्रगती शक्य नाही’
“माणसाचा जन्म समाजात होतो, तो समाजात जगतो आणि शेवटी समाजातच विलीन होतो. त्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे,” असे प्रा. खडसे यांनी सांगितले. संकटाच्या प्रसंगी एकमेकांचा हात धरून अडचणीतून बाहेर पडतो, त्याचप्रमाणे जीवनातही एकमेकांना आधार आणि बळ देत पुढे जाणे आवश्यक आहे, असा संदेश त्यांनी दिला.
‘चल न गावाकडे’च्या ओळींनी जाग्या झाल्या गावच्या आठवणी
कार्यक्रमादरम्यान प्रा. संजय खडसे यांनी कवी अनंत राऊत यांच्या ‘चल न गावाकडे’ या कवितेतील भावस्पर्शी ओळी सादर केल्या. या ओळींमधून गावातील बालपण, शाळा, मित्रपरिवार आणि गावाशी असलेले भावनिक नाते जागे झाले. गावातील शाळेत शिकलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत असल्याचा अभिमान व्यक्त करताना त्यांनी गावाशी असलेले नाते कायम जपण्याचे आवाहन केले.
पालकांचा त्यागच यशाचा पाया
गुणवंत युवकांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचा त्याग आणि कुटुंबीयांचे संस्कार हा महत्त्वाचा पाया आहे. त्यामुळे मुलांनी मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर आपल्या पालकांकडे जबाबदारीने पाहावे, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणावे, असे आवाहन प्रा. खडसे यांनी केले.
ग्रामपंचायत व ७ स्टार मित्र मंडळाचा पुढाकार
गावातील गुणवंतांचा एकत्रित सन्मान करण्याचा उपक्रम राबविल्याबद्दल प्रा. खडसे यांनी ग्रामपंचायत आणि ७ स्टार मित्र मंडळाचे अभिनंदन केले. या उपक्रमासाठी सरपंच शिवाजीराव झोटे, उपसरपंच दीपक बुरकुल, ग्रामपंचायत सदस्य सुनील झोटे, शांताराम मुंढे, सौ. मिनाबाई बन्सोडे, सौ. निर्मला टेकाळे, सौ. सविता झोटे आणि सौ. मीना झोटे यांनी पुढाकार घेतला. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनात शिवाजी बुरकुल, दीपक बुरकुल, गजानन पवार, राजू चित्ते, सुधाकर झोटे, देवानंद झोटे, ज्ञानेश्वर टेकाळे यांच्यासह ७ स्टार मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. तंटामुक्ती समिती आणि शाळा व्यवस्थापन समितीनेही कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
५६ गुणवंतांचा फेटे बांधून गौरव
या सोहळ्यात सावंगी टेकाळे येथील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या ५६ गुणवंत युवकांचा फेटे बांधून व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सत्कारमूर्तींचे आई-वडील, ग्रामस्थ, महिला, युवक तसेच ७ स्टार मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील गुणवंतांचा सन्मान करून त्यांच्या यशाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचा हा उपक्रम सावंगी टेकाळेच्या शैक्षणिक व सामाजिक वाटचालीतील प्रेरणादायी पाऊल ठरला.

