लोणार (वाजिद खान) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त लोणार शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘मी धावतो देशासाठी’ या मॅरेथॉनचे आयोजन सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट २०२६) करण्यात आले. लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, तालुकाध्यक्ष अश्रुजी फुके, नगराध्यक्ष सौ. मीराताई भूषण मापारी व उपनगराध्यक्ष आबेद खान यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मॅरेथॉनचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष लक्ष्मणदादा घुमरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बसस्थानक चौकातून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम भाऊ उमाळकर होते. मॅरेथॉनमध्ये पुरुष व महिला गटासाठी प्रत्येकी पाच बक्षिसे, तसेच २० प्रोत्साहनपर बक्षिसे व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. पुरुष गटात प्रथम क्रमांक शुभम चव्हाण, तर द्वितीय क्रमांक नारायण मूलवंडे यांनी पटकावला. महिला गटात प्रथम गायत्री बोरपी, द्वितीय अश्विनी खोरने, तृतीय वैष्णवी मानक, चतुर्थ वैष्णवी हागे व पाचवा क्रमांक वैष्णवी शेळके यांनी मिळवला. मॅरेथॉन स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण धार चौक येथे करण्यात आले. स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘मी धावतो देशासाठी’ हा संदेश दिला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना लक्ष्मणदादा घुमरे म्हणाले की, युवाशक्तीचे प्रदर्शन आपल्याला जंतर-मंतर येथे पाहायला मिळाले. त्यामुळे युवाशक्तीला प्रोत्साहन देणे हे देशाचे काम आहे. युवकांना योग्य दिशा व संधी मिळाल्यास ते मोठा बदल घडवून आणू शकतात. अध्यक्षीय भाषणात श्याम भाऊ उमाळकर म्हणाले की, मॅरेथॉन ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून स्वतःच्या क्षमतेची, जिद्दीची आणि संयमाची परीक्षा आहे. मॅरेथॉनमधून जीवनातील एक मोठा धडा मिळतो. जीवनात ध्येय गाठण्यासाठी केवळ वेगाने धावणे महत्त्वाचे नसते, तर शेवटपर्यंत टिकून राहणे आणि न थांबता पुढे जाणे महत्त्वाचे असते. या स्पर्धेत सहभागी झालेला प्रत्येक जण आधीच विजेता आहे, कारण स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि आव्हानाचा सामना करण्यासाठी त्याने पाऊल उचलले आहे. धावणे हे केवळ शरीरासाठी नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष सौ. मीराताई मापारी यांनी मुलींचा या स्पर्धेतील मोठा सहभाग कौतुकास्पद असल्याचे सांगितले. मुली कोणत्याही क्षेत्रात कमी पडणार नाहीत, हे या सहभागातून दिसून येते. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांचा वाढदिवस एवढ्या उत्साहात साजरा केल्याबद्दल त्यांनी लोणार काँग्रेसचे मनापासून आभार मानले. यावेळी शांतीलाल गुगलीया व साहेबराव पाटोळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास नगरपालिका उपाध्यक्ष आबेद खान, माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिपडे, गटनेत्या सौ. सीमा नितीन शिंदे, बांधकाम सभापती अनिकेत मापारी, आरोग्य सभापती अब्दुल उबेद, महिला व बालकल्याण सभापती सौ. वर्षा संतोष मापारी, सौ. संध्या शाम राऊत, नगरसेवक गुलाब सरदार, नियोजन सभापती साहेबराव पवार, संतोष मापारी, नगरसेवक जमील कुरेशी, माजी नगरसेवक अंबादास इंगळे, दौलत मानकर, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे, माजी नगरसेवक शंकर हेंद्रे, माजी नगरसेवक सतीश राठोड, प्रा. विठ्ठल भानुसे, शेख अफसर शेख तुराब, शुभम चाटे, भवानी मापारी, मोसिन शहा यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध फ्रंटलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्रुजी फुके यांनी केले. प्रास्ताविक शेख समद यांनी केले, तर आभार आबेद खान यांनी मानले.