श्री महादेव मंदिराचे लोकार्पण उत्साहात संपन्न

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-मोहट्याच्या सर्वांगीण विकासासाठी देवस्थान समिती प्रयत्नशील राहणार : धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थान समितीच्या वतीने जुने मोहटे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री महादेव मंदिराचा लोकार्पण सोहळा तसेच श्री शिवलिंग व नंदी देवतेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवारी (दि. ३०) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

यावेळी बोलताना श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा अहिल्यानगरचे धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप म्हणाले, मोहटे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी देवस्थान समितीच्या वतीने आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील. गावातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, पाण्याची व्यवस्था करणे, जलसंधारणाची कामे हाती घेणे तसेच शासनाच्या विविध योजना गावात प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सकाळी गावातून सुवासिनींची पारंपरिक कलश मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मंदिर उभारणीसाठी जागा दान स्वरूपात दिल्याबद्दल राधाबाई दहिफळे व सविता दहिफळे यांचा देवस्थान समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथून श्री नर्मदेश्वर शिवलिंग व नंदी मूर्ती उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी सैनिक ईश्वर आश्रूबा दहिफळे यांचाही सत्कार करण्यात आला. वेदशास्त्रसंपन्न नारायणदेव सुलाखे खोकरमोहकर, सच्चिदानंद देशपांडे, भूषण साकरे व रविदेवा जोशी यांच्या पौरोहित्यात मंत्रोच्चार व विविध धार्मिक विधी पार पडले. यावेळी श्री शिवलिंग व नंदी देवतेची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्री महादेव मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला.

कार्यक्रमास देवस्थान समितीचे विश्वस्त अशोक दहिफळे, बाबासाहेब दहिफळे, शुभम दहिफळे, शशिकांत दहिफळे, राजेंद्र शिंदे, ॲड. विक्रम वाडेकर, ॲड. कल्याण बडे, ॲड. प्रसन्न दराडे, बाळासाहेब लाहोटी, सामाजिक कार्यकर्ते ॲड. मानसिंग पवार, कुंजीर भाऊ, राजकुमार पाटील, वास्तुविशारद प्रल्हाद जोशी, ठेकेदार मंगेश कुलकर्णी, बांधकाम सल्लागार संजय क्षीरसागर यांच्यासह माजी विश्वस्त, देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे, लेखापाल संदीप घुले उपस्थित होते. तसेच मोहटे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक सोहळ्यानंतर देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Share This Article
Exit mobile version