-आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते; सर्वसामान्यांना व्यसनमुक्ती, शिक्षण आणि अंधश्रद्धामुक्तीचा संदेश देणाऱ्या संत भगवानबाबांचे कार्य आजही प्रेरणादायी
-श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक, श्री संत भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. श्री. नामदेव महाराज शास्त्रीबाबा यांचा विशेष लेख
अहिल्यानगर (बाळासाहेब खेडकर) : महाराष्ट्र ही संतांच्या पदस्पर्शाने व सहवासाने पावन झालेली भूमी आहे. इथे वेगवेगळ्या कालखंडांत अनेक विभूतींनी जन्म घेऊन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्राच्या, विशेषतः मराठवाड्याच्या उद्धारासाठी अशाच एका महान विभूतीने जन्म घेतला. त्या विभूतीचे नाव आहे श्री संत भगवानबाबा.
वृद्ध झालेले श्रीगुरु माणिकबाबांनी आपल्या दौऱ्याचा कार्यभार बाबांवर सोपविला. मराठवाड्यातील प्रत्येक खेडोपाडी जाऊन तेथील लोकांना पवित्र तुळशीच्या माळा घालून प्रथम निर्व्यसनी बनविले. त्या काळात बहुतांश समाज निरक्षर होता. ‘एकर विका; पण मुलांना शिकवा,’ हा बाबांचा उपदेश असायचा. शिक्षण जागृतीचे काम बाबांनी मोठ्या प्रमाणात केले. साधारण १९२० मध्ये बाबांनी प्रथम नारायणगडाहून पंढरपूरसाठी दिंडी काढली. कदाचित ही मराठवाड्यातील पहिलीच दिंडी असावी. त्यानंतर संत एकनाथ महाराजांच्या षष्ठीनिमित्त दुसरी दिंडी बाबांनी काढली. आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या त्या काळातील बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाड्यात बाबांनी आध्यात्मिक क्रांती केली. सर्वसामान्य जनतेला मानवी जीवनाचा बोध करून दिला. मनुष्यजन्माचे व बुद्धीचे महत्त्व पटवून दिले. आज प्रसिद्धीस पावलेले मराठवाड्यातील अनेक संत हे श्री संत भगवानबाबांचे शिष्य आहेत. मुळातच त्यांनी अध्यात्माचा मार्ग सर्व जाती-जमातींसाठी मोकळा केला होता. बाबांच्या पूर्वी संस्थानिक महंत कोणीच नव्हते; केवळ त्यांचे श्रीगुरु माणिकबाबा होते.
गुरुपरंपरेशी असलेले अतूट नाते
श्री संत भगवानबाबांच्या गळ्यात संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची सोन्याची समाधी होती. त्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे गुरुपरंपरा. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आद्य असून, पैठणचे श्री संत भानुदास महाराज यांनी श्री विठ्ठलाला कर्नाटकमधून पुन्हा पंढरपूरला आणले. त्यांची पाचवी पिढी म्हणजे शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराज. श्री संत जनार्दनस्वामी हे जरी नाथ महाराजांचे गुरु असले, तरी श्री विठ्ठलाची उपासना ही पारंपरिकच आहे. नाथ महाराजांचे शिष्य श्री गावबा व त्यांचे शिष्य श्री अनंत महाराज हे मूळ पैठणचेच. त्यांचे शिष्य श्री नगद नारायण महाराज यांनी अंदाजे ३०० वर्षांपूर्वी नारायणगडाची स्थापना केली. नारायणगडाची सातवी पिढी म्हणजे श्री संत भगवानबाबांचे श्रीगुरु श्री माणिकबाबा होत. आठवे महंत म्हणून श्री भगवानबाबांनी अनेक वर्षे नारायणगडावर व्यतीत केली. मात्र वादविवाद वाढल्याने त्यांनी १९५१ मध्ये दसऱ्याच्या दिवशी नवीन गडाची स्थापना केली. आजतागायत श्री क्षेत्र भगवानगडावर स्थापनेचा दिवस म्हणून ‘दसरा’ साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक भगवानगडाचे दर्शन घेण्यासाठी येतात.
शिक्षण जागृतीतून सामाजिक परिवर्तन
शैक्षणिक क्रांतीत सहभागी होताना बाबांनी अनेकांना शाळा काढण्याची प्रेरणा दिली. श्री क्षेत्र भगवानगडावरही त्यांनी विद्यालय सुरू केले. भगवान शिक्षण प्रसारक मंडळ त्यांनी काही ग्रामीण व सुशिक्षित लोकांसह औरंगाबाद येथे स्थापन केले. त्यासाठी जागाही घेतली. उच्च शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी औरंगाबादमध्ये अजबनगर, क्रांती चौक येथे ‘भगवान छात्रालय’ सुरू केले. या छात्रालयातील अनेक विद्यार्थी पुढे नामवंत झाले. या शिक्षण जागृतीसोबतच बाबांचे मुख्य कार्य म्हणजे मनुष्य अंधश्रद्धामुक्त झाला पाहिजे, हे होते. अनेक गावांत त्यांनी पशुहत्या बंद केली. भोगलवाडी येथे रेडा मारण्याची प्रथा होती. वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे गायीची हत्या होत होती, तर मिडसांगवी येथे बकरे मारले जात होते. या प्रथा बंद करून त्यांनी लोकांना नवीन दृष्टी दिली. १ मे १९५८ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते श्री क्षेत्र भगवानगडावर श्री विठ्ठलाच्या मूर्तीची व श्री रुख्मिणी मातेच्या पादुकांची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत शुद्ध एकादशीला लाखो भाविक वारीसाठी येतात. क्रांतिसिंह नाना पाटील, बाळासाहेब भारदे, स्वामी सहजानंदजी भारती आदी थोर व्यक्ती बाबांच्या सहवासात आल्या होत्या.
अनेक अध्यात्मिक केंद्रांची उभारणी
श्री संत भगवानबाबांनी अनेक ठिकाणी अध्यात्माची केंद्रे स्थापन केली. अनेक संतांना सहकार्य केले. बीड जिल्ह्यातील रामगड, विठ्ठलगड, गोरक्षनाथ टेकडी, राजा हरिश्चंद्र संस्थान, उत्तरेश्वर पिंप्री इत्यादींचे ते प्रेरक होते. स्त्रियांनाही त्यांनी त्या काळात समानतेचा न्याय दिला. केजमधील श्री शेषाबाई महाराज, महासांगवीच्या श्री मीराबाई महाराज इत्यादींना संस्थाने निर्माण करून दिली. श्री क्षेत्र गहिनीनाथगडाची मोजणी तर बाबांनी आपल्या स्वतःच्या फेट्याने केली. त्यावेळी श्री संत वामनभाऊ म्हणाले होते, ‘माझ्या म्हातारपणात मला हे झेपणार नाही. तू लक्ष्मीकांत आहेस.’ तेव्हा बाबा म्हणाले, ‘तुम्ही काही चिंता करू नका! मी हे करून देतो.’ बाबा शब्दाला जागले. त्यांनी भगवानगडाचे काम अर्धवट सोडून आपले गवंडी व घडविलेले दगड गहिनीनाथगडावर पाठवून दिले.
भक्तांच्या हृदयात आजही जिवंत स्मृती
पौष वद्य प्रतिपदा, १९ जानेवारी १९६५ रोजी बाबांचे शरीर शांत झाले. तेव्हापासून श्री संत भगवानबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी पौष वद्य प्रतिपदेला लाखो भक्त श्री क्षेत्र भगवानगडावर येऊन आपली श्रद्धा व्यक्त करतात. त्यांचे चरित्र आजही भक्तांच्या मुखी आहे. त्यांचा सहवास लाभलेले भक्तजन आजही त्यांच्या आठवणीने भावनाविवश होतात.
त्यांच्याबद्दल एवढेच म्हणावेसे वाटते—
गेले दिगंबर ईश्वर विभूती ।
राहिल्या त्या कीर्ती जगामाजी ॥
दसरा आणि पुण्यतिथी हे भगवानगडावरील दोन प्रमुख दिवस आहेत. गुरुमंत्रदीक्षा दसऱ्याच्या रात्री दिली जाते. आध्यात्मिक क्रांतीसोबत सर्व मनुष्यमात्रांना शैक्षणिक उंची मिळावी, यासाठी श्री संत भगवानबाबा अहोरात्र चंदनासारखे झिजले. त्यांचा सुगंध आजही दरवळत आहे.
त्यांचे व्यक्तिमत्त्व हे माऊलींच्या शब्दांत पुढील ओवीप्रमाणे होते—
चंद्रमे जे अलांछन ।
मार्तंड हे तापहीन ॥

