-NEET 2026 मध्ये ५६३ गुण; ग्रँट मेडिकल कॉलेज, जे. जे. हॉस्पिटलमध्ये पहिल्याच फेरीत प्रवेश
चिखली (महेंद्र हिवाळे) : जिद्द, चिकाटी आणि आई-वडिलांच्या कष्टांची जाण असेल, तर खेड्यागावातूनही थेट मुंबईतील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत झेप घेता येते, हे किन्ही सवडत येथील एका शेतकरी कुटुंबातील लेकीने दाखवून दिले आहे.
उंद्री (उदयनगर)पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या किन्ही सवडत गावची रहिवासी कु. समीक्षा सहदेव धुरंदर हिने वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या NEET 2026 परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ५६३ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. दि. ३० रोजी जाहीर झालेल्या निकालानंतर पहिल्याच फेरीत महाराष्ट्रातील नामांकित व मानबिंदू असलेल्या ग्रँट मेडिकल कॉलेज, जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे तिची MBBS अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
असा आहे तिचा शैक्षणिक प्रवास
समीक्षाचे प्राथमिक शिक्षण उंद्री येथील सहकार विद्या मंदिरात, तर माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव येथे झाले. तिच्या शैक्षणिक जडणघडणीत नवोदय विद्यालयाची मोलाची भूमिका राहिली. अकरावी आणि बारावीचे शिक्षण तिने दक्षिणा फाउंडेशन, पुणे येथे पूर्ण केले. २०२६ मध्ये झालेल्या HSC परीक्षेत तिने ९२ टक्के गुण मिळवत यश संपादन केले. त्याच वर्षी झालेल्या NEET परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत तिने वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून, ग्रामीण भागात राहून आणि नवोदयसारख्या शासकीय विद्यालयातून शिक्षण घेत मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे. तिच्या या यशाबद्दल किन्ही सवडत, उंद्री आणि चिखली परिसरातून सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. तिच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये, विशेषतः मुलींमध्ये तसेच नवोदय परिवारात नवीन प्रेरणा निर्माण झाली आहे.
‘नवोदयने मला स्वप्न बघायला शिकवले’
“माझे आई-वडील शेतकरी आहेत. त्यांनी खूप कष्ट केले. माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या आई-वडिलांना, नवोदय विद्यालयातील माझ्या गुरुजनांना आणि दक्षिणा फाउंडेशनला देते. नवोदयने मला स्वप्न बघायला शिकवले,” अशी प्रतिक्रिया कु. समीक्षा धुरंदर हिने व्यक्त केली.

