NEET 2026 मध्ये ५६३ गुण; कु. समीक्षा धुरंदरचे घवघवीत यश
चिखली (महेंद्र हिवाळे) : जिद्द, चिकाटी आणि आई-वडिलांच्या कष्टाचे मोल मनात बाळगले तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही यशाचे शिखर गाठू शकतात, हे चिखली तालुक्यातील किन्ही सवडत येथील एका शेतकरी कन्येने सिद्ध करून दाखवले आहे. उंद्री (उदयनगर) जवळील किन्ही सवडत येथील रहिवासी कु. समीक्षा सहदेव धुरंदर हिने NEET 2026 या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ५६३ गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे. ३० ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच फेरीत तिची मुंबईतील नामांकित ग्रँट मेडिकल कॉलेज (जे.जे. हॉस्पिटल) येथे MBBS साठी निवड झाली आहे.
समीक्षाचे प्राथमिक शिक्षण उंद्री येथील सहकार विद्या मंदिरात, तर माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव येथे झाले. नवोदय विद्यालयातील शिस्त आणि शैक्षणिक वातावरणाने तिच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तिची पुणे येथील दक्षिणा फाउंडेशनमध्ये निवड झाली. २०२६ च्या १२ वी (HSC) बोर्ड परीक्षेत तिने ९२ टक्के गुण मिळवून यश मिळवले. १२ वीच्या अभ्यासासोबतच तिने NEET परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले.
एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून, ग्रामीण भागातून आणि शासकीय नवोदय विद्यालयातून शिक्षण घेऊन समीक्षाने मिळवलेले हे यश चिखली परिसर, नवोदय परिवार आणि विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे. तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
“माझे आई-वडील शेतकरी असून त्यांनी माझ्यासाठी अपार कष्ट उपसले. माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय मी माझ्या आई-वडिलांना, नवोदय विद्यालयातील गुरुजनांना आणि दक्षिणा फाउंडेशनला देते. नवोदय विद्यालयानेच मला मोठे स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची ताकद दिली.”
— कु. समीक्षा धुरंदर, यशस्वी विद्यार्थिनी

