क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी बँकांनी पुढे यावे: प्राचार्य विष्णुपंत पाटील

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

बुलढाणा जिल्हा तलवारबाजी असोसिएशनतर्फे क्रीडा गुणीजनांचा सन्मान

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वित्तीय संस्था आणि बँकांनी सामाजिक उत्तरदायित्वातून पुढे येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कला महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य विष्णुपंत पाटील यांनी केले.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या वतीने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू, प्रशिक्षक, संघटक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून प्राचार्य पाटील बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन व सत्कार सभारंभ राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष तथा लखुजीराजे यांचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते पार पडला. या वेळी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनियुक्त संचालक मयूर बाहेकर, माॅ जिजाऊ बँकेचे सचिव नितीन जाधव पाटील, बुलढाणा आर्चरी असोसिएशनचे सचिव प्रा. मनोज व्यवहारे आणि शरद कला महाविद्यालयाचे सचिव अजिंक्य पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना कु. शर्वरी मिसाळ व मयूर बाहेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिरांमुळे खेळाडूंच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली असून राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडूंनी पदकांची कमाई केली आहे, असे त्यांनी नमूद केले. आगामी स्पर्धांमध्ये अधिक उज्ज्वल यश मिळवण्याचा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे संपादकीय संचालक, तथा मुख्याध्यापक शिवश्री प्रवीण मिसाळ पाटील, जीवन जाधव, गणेश सावळे, श्रीराम निळे, चव्हाण साहेब आणि मीनाताई जगताप यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन जेऊघाले यांनी केले, तर शेषनारायण लोढे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सोहळ्याची सांगता कु. शर्वरी मिसाळ हिच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहभोजनाने झाली.

Share This Article
Exit mobile version