मलगी येथे पहाटे महाआरतीने शुभारंभ; बारदरी महादेव मंदिरात अभिषेकाने होणार समारोप
चिखली (अंकुश पाटील) : पंचक्रोशीतील शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आणणारी भव्य मल्लिकार्जुन कावड यात्रा सोमवारी ब्रह्ममुहूर्तावर उत्साहात आयोजित करण्यात आली. संतोष काळे पाटील मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद सर्कल शेळगाव आटोळ येथे या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, पहाटे ४.३० वाजता श्री मल्लिकार्जुन संस्थान, मलगी येथे भाविकांच्या उपस्थितीत महाआरतीने यात्रेचा शुभारंभ झाला.
‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’च्या जयघोषात निघालेली ही कावड यात्रा विविध गावांतून मार्गक्रमण करत शेळगाव आटोळ येथे पोहोचणार आहे. यात्रेचा मार्ग श्री मल्लिकार्जुन संस्थान (मलगी), मुरादपूर फाटा, रामनगर असा राहिला. मेरा चौकी येथे भाविकांसाठी फराळ व पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती, तसेच मेरा खुर्द येथे आरती पार पडली. यानंतर भरोसा येथील महादेव मंदिरात आरती करून ग्रामस्थांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. तेथून पुढे देऊळगाव घुबे, मिसाळवाडी फाटा आणि पिंपळवाडी फाटामार्गे यात्रा शेळगाव आटोळ येथे दाखल होणार आहे.
बारदरी महादेव मंदिरात अभिषेकाने समारोप
कावड यात्रेचा अंतिम समारोप शेळगाव आटोळ येथील प्रसिद्ध बारदरी महादेव मंदिरात होणार आहे. या ठिकाणी शिवभक्तांकडून भक्तिभावाने महादेवाचा अभिषेक करण्यात येईल. यात्रेच्या समारोपप्रसंगी आयोजित करण्यात आलेले भव्य ‘अघोरी तांडव’ हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या पवित्र कावड यात्रेत पंचक्रोशीतील सर्व शिवभक्त, युवक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संतोष काळे पाटील मित्र मंडळ (शेळगाव आटोळ) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

