क्षुल्लक वादातून ६० वर्षीय वृद्धाचा अंत; अमडापूर पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक
चिखली (अंकुश पाटील) : म्हातारपणी ज्या मुलाचा आधार वाटत होता, त्याच मुलाने बकरी विक्रीच्या क्षुल्लक वादातून जन्मदात्या वडिलांची अमानुष मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना नायगाव बु. (ता. चिखली) येथे घडली आहे. लोखंडी फुंकणीने आणि लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ६० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी मुलाला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. कचरुबा वामन गायकवाड (वय ६०, रा. नायगाव बु., मंगरुळ नवघरे) असे मृत वडिलांचे नाव असून, विनोद कचरुबा गायकवाड (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता कचरुबा गायकवाड यांनी मुलगा विनोद याच्याकडे बकरी विक्रीचे पैसे मागितले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन विनोदने वडिलांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. एवढ्यावरच न थांबता, घरातील लोखंडी फुंकणीने कचरुबा यांच्या छातीवर, पोटावर आणि डोक्यावर प्राणघातक हल्ला चढवला.
या भीषण मारहाणीत कचरुबा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वृद्धापकाळात मुलगा पाठीशी उभा राहील अशी आशा बाळगणाऱ्या कचरुबा यांचा मुलाच्याच हातून दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेमुळे चार मुलींच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपले असून गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आरोपी मुलगा अमडापूर पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतकाची पत्नी बेबीबाई कचरुबा गायकवाड (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमडापूर पोलिसांत आरोपी विनोद गायकवाड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), ३५१(२) आणि ३५२ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप आणि रायटर प्रदीप चोपडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

