-सहकार विद्या मंदिर, साखरखेर्डा येथे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
साखरखेर्डा (अंकुश पाटील) : सहकार विद्या मंदिर, साखरखेर्डा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन व रक्षाबंधन या दोन्ही पर्वांचा उत्साहपूर्ण वातावरणात संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, सांघिक भावना तसेच बहीण-भावाच्या प्रेमाचे व आपुलकीचे महत्त्व रुजविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मिस मर्लिन सिल्वेस्टर मॅडम होत्या, तर उपमुख्याध्यापक श्री. समाधान जाधव सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्यानंतर श्री. शोएब खान पठाण सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून राष्ट्रीय क्रीडा दिन व रक्षाबंधनाचे महत्त्व विशद केले. प्रमुख पाहुणे श्री. समाधान जाधव सर यांनी मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच क्रीडा व शारीरिक तंदुरुस्तीला महत्त्व द्यावे, असे आवाहन केले.
खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, संघभावना व खिलाडूवृत्ती विकसित होते, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात मिस मर्लिन सिल्वेस्टर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम व विविध खेळांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नसून प्रेम, विश्वास, काळजी व जबाबदारीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांनी वर्गनिहाय रक्षाबंधन उत्सव उत्साहात साजरा केला. विद्यार्थिनींनी भावांना राखी बांधून औक्षण केले, तर विद्यार्थ्यांनी आपल्या बहिणींना भेटवस्तू देऊन या प्रेमळ नात्याचा आनंद साजरा केला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रवींद्र म्हळसने सर यांनी अत्यंत प्रभावी, सुबक व शिस्तबद्ध पद्धतीने केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. धम्मपाल आराख सर यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे राष्ट्रीय क्रीडा दिन व रक्षाबंधनाचा हा संयुक्त कार्यक्रम संस्मरणीय ठरला.