लोणार येथील लोणी चौफुलीवरील डिव्हायडर बनतोय ‘डेथ ट्रॅप’

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-रात्रीच्या अंधारात वाहनचालकांची कसरत; फलक आणि रिफ्लेक्टर नसल्याने अपघातांचा धोका वाढला

लोणार (वाजिद खान) : लोणार शहरातील अत्यंत गजबजलेली लोणी चौफुली सध्या अपघातांचे केंद्र बनत चालली असून, रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आलेला डिव्हायडर रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. या चौफुली परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अंधाराचे साम्राज्य असते. तसेच ‘समोर डिव्हायडर आहे, वेग कमी करा’ अशा आशयाचा कोणताही दिशादर्शक अथवा चेतावणी देणारा फलक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येथे लावण्यात आलेला नाही.

धक्कादायक बाब म्हणजे या डिव्हायडरवर रात्री चमकणारे रेडियम किंवा रिफ्लेक्टर्सही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अंधारात समोर डिव्हायडर असल्याचा वाहनचालकांना अंदाज येत नाही. या मार्गावरून रात्री जड वाहने तसेच दुचाकींची मोठी वर्दळ असते. मात्र, अचानक समोर येणाऱ्या डिव्हायडरमुळे वाहने घसरणे किंवा थेट धडक होऊन दुचाकीस्वार जखमी होण्याच्या घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रशासनाच्या उपाययोजनांकडे लक्ष

“येथे एखादा मोठा जीवघेणा अपघात होऊन कुणाचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तातडीने या ठिकाणी ठळक चेतावणी फलक लावावेत, डिव्हायडरवर रेडियम रिफ्लेक्टर्स बसवावेत तसेच बंद असलेले पथदिवे सुरू करून पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे. लोणी चौफुलीवरील धोकादायक परिस्थिती लक्षात घेता संबंधित विभागाने कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Exit mobile version