-मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त बुद्धिबळ व १०० मीटर धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन
लोणार (वाजिद खान) : कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार आणि कै. कमलबाई बनमेरू कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट २०२६ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतोष क. बनमेरू यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले, “नियमित सरावाच्या बळावर खेळाडू क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करून सुवर्णपदके पटकावू शकतात. खेळातील प्राविण्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात शासकीय व निमशासकीय क्षेत्रात नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध होतात.” राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी बुद्धिबळ आणि १०० मीटर धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मोठा सहभाग नोंदवला. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्रा. सौरभ गायकवाड यांनी मानले.

