वर्धा राज्यातील पहिले ‘पुस्तकांचे शहर’ होणार

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-शहरातील ग्रंथालयांसाठी ३५ हजार पुस्तके उपलब्ध करून देणार; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मराठी भाषा अधिकाऱ्याची नियुक्ती

वर्धा (प्रकाश कथले) : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्याला राज्यातील पहिले ‘पुस्तकांचे शहर’ म्हणून घोषित करण्यात आले असून, शहरातील ग्रंथालयांसाठी ३५ हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मराठी भाषा विभागाचा आढावा व साहित्यिकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, प्रदीप दाते, प्रा. सरोजिनी देशमुख, रवींद्र शोभणे, माजी प्राचार्य पद्माकर बाविस्कर, डॉ. गजानन कोटेवार, सुलभा पाटील, संजीव लाभे यांच्यासह जिल्ह्यातील साहित्यिक उपस्थित होते. वाचनसंस्कृतीला चालना देण्याच्या दृष्टीने वर्ध्याला ‘पुस्तकांचे शहर’ म्हणून मिळालेली ओळख महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शहरातील विविध ग्रंथालयांना मोठ्या प्रमाणात पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि वाचकांना त्याचा लाभ होणार आहे. वर्ध्याच्या साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेला या उपक्रमामुळे अधिक बळ मिळणार असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मराठी भाषा अधिकारी

मराठी भाषेच्या कामकाजासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वर्ग-१ दर्जाच्या मराठी भाषा अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या शासकीय कामकाजासह संवर्धन आणि प्रसाराच्या उपक्रमांना अधिक गती मिळणार आहे. मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी लंडनमध्येही महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. लंडनमधील ज्या ऐतिहासिक इमारतीत पहिले मराठी मंडळ सुरू झाले होते, ती इमारत महाराष्ट्र शासनाने लिलावात खरेदी केली आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ‘आंतरराष्ट्रीय मराठी भाषा वैश्विक केंद्र’ सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

‘कवितांचे गाव’ही साकारणार

राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची सांस्कृतिक आणि साहित्यिक ओळख जपण्यासाठी ‘कवितांचे गाव’देखील विकसित करण्यात येणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील साहित्यिकांच्या दर्जेदार अप्रकाशित साहित्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मराठी भाषा विभाग पुढाकार घेणार आहे. साहित्याची तपासणी करून दर्जेदार साहित्य विभागामार्फत प्रकाशित केले जाणार आहे. तसेच प्रकाशित झालेली पुस्तके शासनाकडून खरेदी करून ती राज्यातील विविध ग्रंथालयांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. त्यामुळे नवोदित तसेच ग्रामीण भागातील साहित्यिकांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे डॉ. सामंत यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद

वर्धा जिल्ह्याला साहित्यिकांचा समृद्ध वारसा लाभला आहे. राज्यामध्ये ‘पुस्तकाचे गाव’ ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. याच धर्तीवर ‘पुस्तकांचे शहर’ करण्यात यावे आणि त्याची सुरुवात वर्ध्यापासून करावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केली. या मागणीला मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील पहिले ‘पुस्तकांचे शहर’ म्हणून वर्धा शहराची निवड केली. यावेळी जिल्ह्यातील मराठी साहित्यिकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. त्यावर शासन सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच तोडगा काढेल, असे आश्वासन मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

Share This Article
Exit mobile version