ज्ञानमंदिरात ‘दारूचा अड्डा’! ब्रम्हपुरी जि. प. शाळेच्या आवारात उघडपणे अवैध दारू विक्री!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

कोंडवाड्याचा गैरवापर; दारूड्यांचा सुळसुळाट व रिकाम्या बाटल्यांचा खच; शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थ आक्रमक; तात्काळ कारवाईची मागणी

हिवरा आश्रम (अरूणा म्हस्के): शाळा ही ज्ञानाचे पवित्र मंदिर मानली जाते, जिथे बालकांचे भवितव्य घडवले जाते. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या आवारात असलेल्या कोंडवाड्याचा गैरवापर करत तेथे चक्क उघडपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केला आहे. शाळेच्या परिसरातच मद्यपी दारू पिऊन रिकाम्या बाटल्या टाकत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शैक्षणिक वातावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद शाळा समितीचे अध्यक्ष सागर मनोहर म्हस्के यांनी ब्रम्हपुरीच्या सरपंच व ग्रामसेवकांना निवेदनाद्वारे तात्काळ कडक कारवाई करण्याची आणि शाळेचे पवित्र्य जपण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शाळेच्या परिसरात सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे. लहान मुलांच्या मनावर या वाईट कृत्यांचा दुष्परिणाम होत असून, गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

 या संपूर्ण गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषद शाळा समितीचे अध्यक्ष सागर मनोहर म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांना लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “शाळेच्या आवारातील कोंडवाड्याचा गैरवापर तातडीने थांबवण्यात यावा आणि तिथे चालणाऱ्या अवैध दारू विक्रीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.”

तक्रार निवेदनावर सागर म्हस्के, अमोल म्हस्के, विकास म्हस्के, भागवत कांबळे, नंदकिशोर कांबळे, ज्ञानेश्वर देऊळकर, विनोद देऊळकर, गटलू नवघरे आदी ग्रामस्थ व पालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

शाळेसारख्या संवेदनशील ठिकाणी उघडपणे चालणाऱ्या अवैध दारू विक्रीबाबत पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग (Excise Department) काय पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. दोषींवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांकडून दिला जात आहे.

Share This Article
Exit mobile version