‘नाथांच्या’ पालखीखाली लोटांगण घेत भक्तिभावाचा अनोखा सोहळा

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-भांगरवाडीच्या ओम चैतन्य कानिफनाथ सेवा मंडळाची पालखी मिरवणूक उत्साहात; हजारो नाथभक्तांची उपस्थिती

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : मढी, ता. पाथर्डी : तिसऱ्या श्रावण शुक्रवारनिमित्त श्रीक्षेत्र मढी येथे भांगरवाडी (लोणावळा) येथील ओम चैतन्य कानिफनाथ सेवा मंडळाच्या पालखी सोहळ्याने भक्तिभावाला अनोखे रूप दिले. पारंपरिक वाद्यांचा निनाद, ढोल-ताशांचा गजर आणि ‘कानिफनाथ महाराज की जय’च्या जयघोषात पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.

शुक्रवारी दुपारी तीन वाजता भांगरवाडी येथून आलेली पालखी पारंपरिक वाद्यांच्या गजरात कानिफनाथ गडावर दाखल झाली. यावेळी अनेक भाविकांनी स्वतःहून जमिनीवर लोटांगण घेत पालखीला आपल्या अंगावरून पुढे जाण्यासाठी मार्ग करून दिला. त्यानंतर पालखीने मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण केली आणि भाविकांनी कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेतले. श्रद्धेने भारावलेले हे अनोखे दृश्य पाहण्यासाठी गडावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्रीक्षेत्र मढी येथे श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी चैतन्य कानिफनाथांची पालखी निघते. मात्र, तिसऱ्या श्रावण शुक्रवारी या सोहळ्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. भांगरवाडी, लोणावळा, आळंदी, जळगाव, पुणे, नाशिक, मावळ, ठाणे, मोशी आदी भागांतून हजारो नाथभक्त पायी पालख्यांसह मढी गडावर दाखल होतात. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते.

ओम चैतन्य कानिफनाथ सेवा मंडळाची पालखी गेल्या तीस वर्षांपासून भांगरवाडी ते मढी असा पायी प्रवास करत आहे. यंदाही ही पालखी मंगळवारी मढी येथे दाखल झाली होती. दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या पालखी सोहळ्यास मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनीही भेट देऊन कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेतले. पालखी सोहळ्यात सेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिस्तबद्ध नियोजनामुळे संपूर्ण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. लोटांगण घेत पालखीला आपल्या अंगावरून पुढे जाण्यासाठी मार्ग करून देण्याची परंपरा ही नाथभक्तांची कानिफनाथ महाराजांवरील अपार श्रद्धा आणि अढळ विश्वासाचे प्रतीक असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. याबाबत ओम चैतन्य कानिफनाथ सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष महाराज पिंजण आणि पालखी चालक राजेश भाऊसाहेब जायगुडे यांनी माहिती दिली.

Share This Article
Exit mobile version