परमपूज्य जगद्गुरु श्री. पलसिद्ध महास्वामीजी आरोग्यसेवा गौरव पुरस्कार डॉ. नरेंद्र फिस्के यांना जाहीर

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि ग्रामीण रुग्णसेवेची दखल; वेदान्ताचार्य सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : जगद्गुरु श्री. पलसिद्ध महास्वामीजी मठ संस्थान, साखरखेर्डा, बुलढाणा यांच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा, समाजहिताची तळमळ आणि ग्रामीण आरोग्यसेवेला आधुनिकतेची नवी दिशा देणाऱ्या अखंड सेवाभावी कार्याची दखल घेत “परमपूज्य जगद्गुरु श्री. पलसिद्ध महास्वामीजी आरोग्यसेवा गौरव पुरस्कार – साखरखेर्डा २०२६” या मानाच्या पुरस्कारासाठी डॉ. नरेंद्र फिस्के यांची निवड करण्यात आली आहे.

गोविंदा फिस्के यांचे सुपुत्र असलेल्या डॉ. नरेंद्र फिस्के यांनी मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख या छोट्याशा गावातून आपल्या वैद्यकीय प्रवासाची सुरुवात केली. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS आणि MD हे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये IDCCM (Intensive Care and Critical Care Medicine) हे विशेष प्रशिक्षण घेत त्यांनी क्रिटिकल केअर मेडिसिन क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण केली. कोरोना महामारीच्या अत्यंत भयावह आणि आव्हानात्मक काळात संपूर्ण समाज भयभीत असताना स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता डॉ. फिस्के यांनी रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले. गंभीर रुग्णांच्या उपचारांपासून आपत्कालीन वैद्यकीय सेवांपर्यंत त्यांनी बजावलेल्या कर्तव्याची समाजाने विशेष दखल घेतली. त्यांच्या या सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून विविध स्तरांवर त्यांना ‘आरोग्यदूत’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. सध्या गोविंद क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटल, शिवाजीनगर, मेहकर येथे मेडिकल डायरेक्टर म्हणून कार्यरत असलेले डॉ. फिस्के ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार, आपत्कालीन सेवा आणि अतिदक्षता उपचार आपल्या परिसरातच उपलब्ध करून देण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.

वैद्यकीय ज्ञानाला मानवतेची जोड देत ‘रुग्णसेवा हीच मानवसेवा आणि समाजसेवा हीच खरी साधना’ या भावनेने कार्य करणाऱ्या डॉ. नरेंद्र फिस्के यांच्या ज्ञान, कर्तृत्व, सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि संकटसमयी बजावलेल्या अतुलनीय आरोग्यसेवेचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वेदान्ताचार्य सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र फिस्के यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल वैद्यकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Share This Article
Exit mobile version