-कतार एअरवेजनंतर आता न्यूझीलंड एअरमध्ये सेवा; ग्रामीण भागातील युवकांसाठी निलेश यांचा प्रेरणादायी प्रवास
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी या छोट्याशा गावातील निलेश ऊर्फ सोनू रमेश खरात यांनी आपल्या गुणवत्ता, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सातासमुद्रापार आपल्या गावाचे नाव पोहोचविले आहे. विमानसेवेचे लहानपणापासूनच आकर्षण असलेल्या निलेश यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर आंतरराष्ट्रीय विमानसेवा क्षेत्रात उल्लेखनीय स्थान निर्माण केले असून, सध्या ते न्यूझीलंड एअरमध्ये सेवेत कार्यरत आहेत.
शिंदी हे साखरखेर्डा गटातील एक छोटेसे खेडेगाव. येथील शेतकरी रमेश मारोती खरात यांनी मुलगा निलेश याच्यातील गुणवत्ता ओळखून त्याला शिक्षणासाठी बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठमध्ये दाखल केले. निलेश यांना लहानपणापासूनच विमानांविषयी विशेष आकर्षण होते. त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण बुलढाणा येथे पूर्ण केले. पुढे विमानसेवा क्षेत्रातच काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने त्यांनी दिल्ली येथील फ्रँकलिन इन्स्टिट्यूटमधून एव्हिएशनची पदवी प्राप्त केली. आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करत निलेश यांनी विविध विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या भेटीगाठी घेतल्या. विमानसेवेत काम करण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर त्यांच्या जिद्द आणि चिकाटीला यश मिळाले आणि २०१४ मध्ये त्यांनी जगातील नामांकित कतार एअरवेजमध्ये सेवा सुरू केली. विमानसेवेत कार्यरत असतानाही त्यांची ज्ञान संपादन करण्याची आणि स्वतःला अधिक सक्षम करण्याची धडपड सुरूच राहिली.
कतार एअरवेजमध्ये २०२४ पर्यंत सेवा बजावल्यानंतर निलेश यांनी पुढील उच्च शिक्षणासाठी न्यूझीलंड गाठले. तेथे आयसीएल या नामांकित संस्थेत तसेच ऑकलंड विद्यापीठाशी संबंधित अभ्यासक्रमातून मास्टर ऑफ मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवत त्यांनी ही पदवी विशेष प्रावीण्यातून प्राप्त केली. त्यानंतर त्यांच्या गुणवत्तेची दखल घेत त्यांना न्यूझीलंड एअरमध्ये सेवेत कार्य करण्याची संधी मिळाली असून, सध्या ते तेथे कार्यरत आहेत.
ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी प्रवास
शिंदीसारख्या ग्रामीण भागातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या निलेश खरात यांनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विमानसेवा क्षेत्रात मिळविलेले यश निश्चितच प्रेरणादायी आहे. परिस्थिती कोणतीही असो, ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यश मिळविता येते, हे निलेश यांच्या प्रवासातून दिसून येते. त्यांच्या या यशामुळे शिंदी गावाचे नाव सातासमुद्रापार पोहोचले असून, परिसरातील युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत. आपल्या या यशाचे श्रेय निलेश खरात हे आपल्या आई-वडिलांसह गुरुजनांना देतात. त्यांच्या या उतुंग यशाबद्दल शिंदी तसेच साखरखेर्डा परिसरातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

