विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करा

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-वैशाली खेडेकर यांचे पोलिसांना निवेदन

चिखली (अंकुश पाटील) : शहरातील शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्गांच्या परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या तसेच टवाळखोरी आणि दादागिरी करणाऱ्या युवकांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी चिखली नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ. वैशालीताई कपिल खेडेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदारांना निवेदन दिले असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत काही युवक दुचाकींवरून शाळांच्या परिसरात घोळका करून उभे राहत असल्याच्या तक्रारी आहेत. विद्यार्थिनी शाळेबाहेर पडताच त्यांच्या मागे दुचाकीवरून फिरणे, अश्लील शेरेबाजी करणे तसेच छेडछाड करण्याचे प्रकार घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही युवक विद्यार्थ्यांशी विनाकारण वाद घालून दादागिरी करीत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

सायंकाळी शिकवणी वर्गांजवळ टवाळखोरांचा वावर

विशेषतः सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या सुमारास पारधी बाबा मंदिर परिसरातील शिकवणी वर्गांजवळ दुचाकींवरून फिरणाऱ्या टवाळखोर युवकांचा वावर वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, या परिसरात पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास महिलांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून टवाळखोरांचा बंदोबस्त करू, असा इशारा सौ. वैशालीताई खेडेकर यांनी दिला. मुलींच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. निवेदन देतेवेळी कपिल खेडेकर तसेच पोलीस उपनिरीक्षक लोखंडे उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version