-अस्वच्छता, अंधारामुळे महिला-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; अतिक्रमण हटविण्याची ग्रामस्थांची मागणी
सुलतानपूर (वाजिद खान) : दोन राज्य महामार्गांना जोडणारे महत्त्वाचे गाव म्हणून सुलतानपूरची ओळख आहे. दररोज हजारो प्रवासी, विद्यार्थी आणि नोकरदारांचा राबता असलेल्या सुलतानपूर बसथांबा परिसरात प्रवाशांच्या मूलभूत गरजांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी सरपंच तथा ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सुलतानपूर यांना दि. २४ ऑगस्ट रोजी लेखी निवेदन दिले आहे. स्वच्छतागृह परिसराची पाहणी करून तातडीने सर्व अतिक्रमणे हटवावीत, परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी तसेच नियमित स्वच्छता आणि देखभाल करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास कष्टकरी संघाच्या वतीने ग्रामस्थ आणि प्रवाशांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
महिला प्रवाशांची गैरसोय
“बसची वाट पाहताना स्वच्छतागृहाची गरज भासते; मात्र तेथे जाणेच अवघड वाटते. ग्रामपंचायतीने महिलांना सुरक्षित वाटेल, अशी स्वच्छ आणि प्रकाशयुक्त व्यवस्था करावी,” अशी मागणी महिला प्रवाशांनी केली. एका पुरुष प्रवाशानेही, “दररोज प्रचंड गर्दी असते. स्वच्छतागृह ही मूलभूत गरज आहे. अतिक्रमण हटविल्यास सर्वांनाच दिलासा मिळेल,” अशी प्रतिक्रिया दिली. या निवेदनावर रमेश रिंढे, भाऊराव भालेराव, सागर पनाड, राजेश पिंपरकर, दत्तात्रय रिंढे, दामोधर कुडके, शिवशंकर निलक, गणेश रत्नपारखी, रामा जुमडे, प्रकाश साखरे आणि गजानन मापारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या मागणीला शेकडो ग्रामस्थ आणि प्रवाशांचे समर्थन असल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले. निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी, पंचायत समिती लोणार, तहसीलदार लोणार आणि मेहकर पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या आहेत. आता या रास्त मागणीकडे ग्रामपंचायत प्रशासन किती गांभीर्याने पाहते आणि अतिक्रमण हटविण्यासह स्वच्छता व प्रकाश व्यवस्थेबाबत कारवाई कधी करते, याकडे संपूर्ण सुलतानपूरकरांचे लक्ष लागले आहे.

