क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांना आकाशवाणी आमदार निवास परिसरात अटक

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-मंत्रालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त; क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबई (सुरेश हुसे) : शेतकरी प्रश्नांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनाची तीव्रता वाढू नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने मंत्रालय परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. मंत्रालय परिसरातील झाडांभोवतीही पोलिसांचा पहारा असल्याचे चित्र पाहायला मिळत असून, आंदोलनकर्त्यांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात आंदोलनासाठी जमलेल्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आकाशवाणी आमदार निवास परिसरातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी डॉ. टाले यांना ताब्यात घेतल्यानंतर पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून विविध ठिकाणी कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आंदोलनासाठी मुंबईत पोहोचलेल्या अनेक शिलेदारांची धरपकड सुरू असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. मात्र, पोलिसांच्या कारवाईनंतरही शेतकरी प्रश्नांसाठीचा संघर्ष थांबणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या आंदोलनाचे प्रमुख नेतृत्व करणारे रविकांत तुपकर यांचा ठावठिकाणा अद्याप स्पष्ट झालेला नसल्याने उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या पुढील भूमिकेकडे राज्यातील शेतकरी आणि आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे. तुपकर कुठे आहेत आणि आंदोलनाची पुढील दिशा काय असणार, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतील या घडामोडींमुळे शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. एका बाजूला प्रशासनाकडून आंदोलन रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकरी व कार्यकर्ते आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या धरपकडीने आंदोलन थांबणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून, आंदोलनाची पुढील दिशा आणि रविकांत तुपकर यांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Exit mobile version