-साखरखेर्डा येथे तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; महाराष्ट्रभरातून वीरशैव समाजबांधव सहभागी होणार
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथील श्रीमज्जगद्गुरु पलसिद्ध शिवाचार्य महास्वामींचा ९६८ वा स्मृतीमहोत्सव ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वीरशैव धर्मीय समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

सकल मानवजातीच्या कल्याणासाठी उच्च व उदात्त मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या वेदागमप्रसिद्ध श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्यांनी ‘सर्वं शिवमयं जगत्’ हा समानतेचा संदेश देण्यासाठी वीरशैव धर्माची स्थापना केली. पंचाचार्य जगद्गुरू, प्राचीन शिवशरण तसेच धर्मगुरू शिवाचार्यांनी शूद्र, ब्राह्मण, स्त्री-पुरुष असा उच्च-नीच भेदभाव न करता सर्वांना समान अधिकार देणारी परंपरा भारतात रुजवली. दहाव्या शतकात या परंपरेला उज्जयिनी सिद्धधर्म सिंहासनाधीश्वर १००८ श्रीमज्जगद्गुरु पलसिद्ध महास्वामी यांनी पुढे नेले. त्यांनी धर्मप्रचारासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथे धर्मपीठाची स्थापना करून पलाश वृक्षाखाली संजीवन समाधी घेतली. धर्मप्रचाराच्या यात्रेत त्यांनी अनेक दिनदुबळ्यांचा उद्धार केला तसेच अज्ञानी व धर्मभ्रष्ट लोकांना दिव्य उपदेशातून सन्मानाचा मार्ग दाखविला.
तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम
श्रीमज्जगद्गुरु पलसिद्ध महास्वामींचा ९६८ वा स्मृतीमहोत्सव श्री प.पू. ष.ब्र. १०८ वेदांताचार्य शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता नामस्मरणाने महोत्सवाला प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजता शिवदीक्षा व गुरुमंत्र संस्कार विधी तसेच येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत करण्यात येईल. दुपारी ४ वाजता दिंड्यांसह पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून, रात्री भक्तिसंगीताचा कार्यक्रम होईल. १ सप्टेंबर रोजी सकाळी श्रींच्या मूर्तीवर तसेच संजीवन समाधीवर रुद्राभिषेक व महापूजा होईल. सकाळी ११ वाजता व्याख्यानानंतर धर्मसभा, मान्यवरांचे स्वागत आणि गुरुवर्यांचे आशीर्वचन होणार आहे. त्यानंतर अध्यक्षीय समारोप व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री शिवकीर्तन व जागर होईल. २ सप्टेंबर रोजी सकाळी रुद्राभिषेक व महाप्रसादाचे कीर्तन होईल. सकाळी ११ वाजता धर्मसभा व उपस्थित गुरुवर्यांचे आशीर्वचन होणार असून, महाप्रसाद वितरणाने तीन दिवसीय स्मृतीमहोत्सवाची सांगता होईल. अशी माहिती मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी दिली आहे.

