नेपाळमध्ये महापुरात हजारो वाहून गेले; १०५ भारतीयांसह ५०० पर्यटक बेपत्ता!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– ग्लेशिअल लेक फुटल्याने भोटेकोशीला जलप्रलय; रस्ते व जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त, ७० हून अधिक जवानांशी संपर्क तुटला!
– १०५ भारतीय पर्यटकांची माहिती पडताळण्याचे काम सुरू; भारताकडून ३० हून अधिक हेलिकॉप्टरद्वारे युद्धपातळीवर बचावकार्य!

रसुवा / काठमांडू/नवी दिल्ली (आवेश तिवारी) : नेपाळ-तिबेट सीमेवरील रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भीषण नैसर्गिक आपत्ती ओढवली. तिबेटच्या बाजूने भोटेकोशी नदीच्या पात्रात आलेल्या अचानक (फ्लॅश फ्लड) महापुरामुळे नदीकाठची गावेच्या गावे वाहून गेली आहेत. या प्रलयंकारी पूरपरिस्थितीत आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नेपाळ पोलिसांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. तथापि, किमान दोन हजार लोकं आतापर्यंत वाहून गेल्याचा तेथील प्रसारमाध्यमांचा अंदाज आहे. दरम्यान, ५०० हून अधिक लोक बेपत्ता असून यामध्ये १०५ हून अधिक भारतीय पर्यटकांचा समावेश आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

तिबेटच्या दिशेने असलेल्या हिमनदीच्या सरोवराचा (ग्लेशिअल लेक) बांध फुटल्याने सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भोटेकोशी नदीच्या पाणीपातळीत अनपेक्षित आणि प्रचंड वाढ झाली. पाण्याच्या या प्रचंड वेगाने रसुवा जिल्ह्यातील टिमुरे, स्याफ्रुबेसी आणि आसपासच्या परिसराला झोडपून काढले. ज्या सरोवराचा बांध फुटून हा हाहाकार उडाला, तिथे अजूनही सुमारे सात मीटर उंच पाण्याचा नैसर्गिक साठा शिल्लक आहे. हा साठा फुटल्यास पुन्हा पूर येण्याचा धोका असल्याने संपूर्ण परिसराला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

या आपत्तीत रस्ते, दूरसंचार यंत्रणा आणि चिलिमे जलविद्युत प्रकल्पासह महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरपरिस्थितीत नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि लष्कराचे सुमारे ७० हून अधिक जवान तसेच सीमाशुल्क व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संपर्काबाहेर आहेत. ‘नेपाळ टुरिझम बोर्ड’नुसार बेपत्ता लोकांमध्ये ३०० हून अधिक परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. यातील १०५ भारतीय नागरिकांची माहिती पडताळण्याचे काम ट्रॅव्हल एजन्सी आणि स्थानिक प्रशासनामार्फत सुरू आहे.

आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी नेपाळ लष्कर आणि खाजगी चालकांची ३० हून अधिक हेलिकॉप्टर्स मदत व बचावकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, भारताने नेपाळच्या मदतीसाठी तात्काळ पुढाकार घेतला आहे. भारतीय हवाई दलाचे ‘C-130’ आणि ‘C-17’ ही दोन विशेष विमाने मदत साहित्य घेऊन नेपाळकडे रवाना होत आहेत.

बिहारमधील नद्यांना महापूर, भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा

नेपाळमध्ये झालेल्या आकस्मिक ढगफुटी आणि हिमनदीचे सरोवर फुटल्यामुळे तिबेट आणि नेपाळच्या सीमावर्ती भागातील नद्यांना प्रचंड रौद्ररूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या बिहार राज्यात महापुराचा मोठा धोका निर्माण झाला असून, संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी वाल्मिकीनगर येथील गंडक बॅरेजचे सर्व ३६ दरवाजे तातडीने उघडण्यात आले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधू-भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं म्हटलंय. नेपाळमधील पुरामुळे बिहारमधील अनेक जिल्ह्यांना ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे. नेपाळमधील अनेक भागांची सीमा बिहारला लागून आहे.

Share This Article
Exit mobile version