‘भगवानगडाचं काम हेच चारी धाम’; घोगस-पारगावकरांची स्वच्छतेची अनोखी सेवा

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-महिन्याच्या द्वादशीला भगवानगडावर स्वच्छता मोहीम; वर्षानुवर्षे अखंड सुरू आहे सेवाव्रत

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : ‘भगवानगडाचं काम हेच चारी धाम’ ही भावना मनात ठेवून घोगस-पारगावकर ग्रामस्थांनी भगवानगडावरील स्वच्छतेची अनोखी सेवा गेल्या अनेक वर्षांपासून अखंड सुरू ठेवली आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. श्री. नामदेव महाराज शास्त्री बाबांच्या आदेशानुसार दर महिन्याच्या शुद्ध द्वादशीला ग्रामस्थ भगवानगडावर एकत्र येतात. एकादशीला लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांमुळे गडावर साचलेल्या कचऱ्याची स्वच्छता करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते.

श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक संत श्री भगवानबाबा यांनी १९५८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते भगवानगडावर विजय पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून दर महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला भगवानगडावर हजारो भाविक दर्शनासाठी येतात. एकादशीच्या दिवशी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने गडाच्या वतीने दिवसभर भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केली जाते.

दररोज हजारो भाविकांना मोफत प्रसाद

एकादशीव्यतिरिक्त इतर दिवशीही दररोज किमान पाच ते सहा हजार भाविक भगवानगडावर दर्शनासाठी येतात. गडाच्या वतीने भाविकांना मोफत प्रसाद दिला जातो. अन्नदानासाठी परिसरातील जवळपास १०० गावांमधून भाकरी आणल्या जातात. गावांच्या लोकसंख्येनुसार दररोज एक ते सहा गावांमधून भाकरी आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावासाठी महिन्यातील एक निश्चित तारीख ठरविण्यात आली असून, त्या दिवशी संबंधित गावातील ग्रामस्थ मंदिरात भाकरी जमा करतात. सकाळी ठीक १० वाजता भगवानगडाची गाडी संबंधित गावात जाऊन भाकरी घेऊन येते. तोपर्यंत गडावर भाजी तयार ठेवलेली असते. दररोज सकाळी ११ ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत भगवानगडावर येणाऱ्या भाविकांना मोफत प्रसाद दिला जातो.

एकादशीला लाखो भाविकांची मांदियाळी

शुद्ध पक्षातील एकादशीला भगवानगडावर भाविकांचा मोठा जनसागर उसळतो. संपूर्ण फराळ गडावरच तयार केला जातो आणि दिवसभर लाखो भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. भाविक विजय पांडुरंग तसेच संत श्री भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन पानफुले, नारळ, पेढे आदी अर्पण करतात. दिवसभर सुरू असलेल्या अन्नदानामुळे खरकटे, अन्नपदार्थांचे अवशेष आणि अन्य कचरा मोठ्या प्रमाणावर जमा होतो. गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरही फराळ व अन्य खाद्यपदार्थांची दुकाने मोठ्या संख्येने थाटली जात असल्याने या परिसरातही मोठ्या प्रमाणावर कचरा साचतो.

द्वादशीला ‘नामदेव पायरी’कडून स्वच्छता सेवा

एकादशीनंतरच्या शुद्ध द्वादशीला सकाळी ठीक ७ वाजता घोगस-पारगावकर ग्रामस्थ भगवानगडावर एकत्र येतात. ‘नामदेव पायरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ग्रामस्थांकडून संपूर्ण गड परिसराची स्वच्छता केली जाते. जमा झालेला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जाते. धार्मिक स्थळी केवळ दर्शन आणि पूजा न करता स्वच्छतेलाही सेवा आणि भक्तीचे स्वरूप देत ही मंडळी वर्षानुवर्षे निस्वार्थपणे सेवा बजावत आहेत. स्वच्छता मोहीम पूर्ण केल्यानंतर संत श्री भगवानबाबांचा आशीर्वाद घेऊन ही सेवा पूर्णत्वास नेली जाते.

आदेशाचे सेवेत रूपांतर

भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. श्री. नामदेव महाराज शास्त्री बाबांच्या आदेशानुसार ही स्वच्छता सेवा सुरू आहे. भगवानगडाचे प्रधानाचार्य ह.भ.प. वेदांताचार्य श्री. नारायण महाराज शास्त्री (स्वामीजी) गडावरील विविध व्यवस्थेवर देखरेख ठेवतात. ‘सेवा हीच भक्ती’ आणि ‘स्वच्छता हीच भगवानगडाची खरी सेवा’ या भावनेतून घोगस-पारगावकर ग्रामस्थांनी जपलेली ही अनोखी परंपरा धार्मिक स्थळाच्या स्वच्छतेसोबतच सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारी ठरत आहे.

Share This Article
Exit mobile version