आरक्षणाच्या हक्कासाठी ओबीसींचा एल्गार; १ सप्टेंबरला मुंबईत लाखोंनी धडक द्या : लक्ष्मण हाके

admin Add a Comment 5 Min Read
5 Min Read

-बोधेगावातील मेळाव्यात हाके यांचा सरकारवर घणाघात; “आरक्षणाला धक्का दिल्यास ओबीसी शांत बसणार नाही”

बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही. आरक्षणाच्या रक्षणासाठी आता निर्णायक लढाईची वेळ आली असून, मतभेद, पक्षीय राजकारण आणि वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून एकसंघ व्हा. १ सप्टेंबरला मुंबईत होणाऱ्या एल्गार मेळाव्यात लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन ओबीसींची ताकद दाखवा, असे आक्रमक आवाहन ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले.

बोधेगाव येथील वामनभाऊनगर येथे आयोजित ओबीसी मेळाव्यात हाके बोलत होते. मराठवाडा दौऱ्यावर जात असताना त्यांनी या मेळाव्यास भेट दिली. यावेळी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी सरकार आणि राज्यकर्त्यांवर जोरदार टीका केली.

‘ओबीसींचे आरक्षण हा संविधानिक हक्क’

हाके म्हणाले की, ओबीसींचे आरक्षण हा संविधानाने दिलेला हक्क आहे. हा हक्क हिरावून घेण्याचा किंवा त्याला धक्का देण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावर नियमबाह्य पद्धतीने निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ओबीसी समाजाने आता केवळ चर्चा न करता गावागावांत संघटन मजबूत करून आपल्या हक्कासाठी संघर्ष उभारला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

‘ओबीसींच्या मतांवर सत्ता, आरक्षणाच्या वेळी मौन का?’

ओबीसी समाजाच्या मतांवर सत्ता मिळविणारे राज्यकर्ते आरक्षणाच्या प्रश्नावर मात्र गप्प बसल्याचा आरोप हाके यांनी केला. “ओबीसींच्या मतांची गरज असताना समाज आठवतो; मात्र आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला की भूमिका घेण्यास टाळाटाळ का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ओबीसी समाजातील राजकीय नेतृत्वाने पक्षीय हितापेक्षा समाजाच्या घटनात्मक हक्काला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे. व्यक्तीपेक्षा समाज मोठा आणि राजकारणापेक्षा आरक्षणाचा हक्क मोठा आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

बोगस प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून संताप

आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी बोगस प्रमाणपत्रांचा वापर होत असल्याचा आरोप करत हाके यांनी या प्रकारामुळे पात्र ओबीसी युवकांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या संधींवर परिणाम होत असल्याचे सांगितले. “पात्र युवकांच्या हक्कावर कुणी अतिक्रमण करत असेल तर ओबीसी समाज ते सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. बोगस प्रमाणपत्रांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

‘१ सप्टेंबरला मुंबईत ताकद दाखवा’

“आरक्षण वाचवायचे असेल तर घरात बसून चालणार नाही. १ सप्टेंबरला मुंबईच्या मैदानात उतरावे लागेल,” असे सांगत हाके यांनी राज्यातील ओबीसी समाजाला मुंबईतील एल्गार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. पुणे जिल्ह्यातील पाटस येथून ओबीसी समाजबांधव एकत्रितपणे रथासह मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईतील मेळाव्यात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून ओबीसी समाजाची एकजूट आणि ताकद सरकारला दाखविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

सत्तेच्या राजकारणावरही हल्लाबोल

सत्तेसाठी पक्षनिष्ठा आणि विचारधारा बाजूला सारून पक्षांतराचे राजकारण सुरू असल्याची टीका हाके यांनी केली. साखर कारखाने, सूतगिरण्या, सहकारी संस्था आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसी समाजाला अपेक्षित प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. महामानवांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकाराची ताकद ओबीसी समाजाने ओळखली पाहिजे. मतांची ताकद वापरून आपल्या हक्कासाठी ठाम भूमिका घेणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले.

‘मतभेद विसरा, एकजूट दाखवा’

ओबीसी समाजातील सर्व संघटना, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वैयक्तिक तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज हाके यांनी व्यक्त केली. “आज एकजूट दाखवली नाही तर उद्या आपल्या पुढच्या पिढीला त्याची किंमत मोजावी लागेल,” असे सांगत त्यांनी आरक्षणाच्या लढ्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी बळीराम खटके व रामजी अंधारे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन बाजीराव लेंडाळ यांनी केले. मेळाव्यास बजरंग सानप, बालाजी बारगजे, कोळेकर सुनील ढाकणे, उबाळे, भागवत शिंगाडे, शिवाजी खेडकर, केशव खेडकर, लक्ष्मण आघाव, मारुती आघाव, अंकुश खेडकर, भीमराज बनसोडे, माणिक गर्जे, भास्कर मासाळकर, संदीप हुगे, गुलाबराव गव्हाणे, मोहन रामनाथ थोरे, बाळासाहेब ढाकणे, गोरख खेडकर, मारुती अभंग, त्रिंबकराव कंठाळे यांच्यासह परिसरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रामनाथ खेडकर यांनी आभार मानले.

चौकट

“मुंडे असते तर पवारांना सोबत घेऊन आरक्षणाचा तोडगा काढला असता”

आज लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब असते तर त्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांना सोबत घेत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न घटनात्मक मार्गाने सोडविण्यासाठी निर्णायक भूमिका घेतली असती, अशी भावना ओबीसी मेळाव्यात व्यक्त करण्यात आली. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असताना पक्षापेक्षा समाज आणि राजकारणापेक्षा आरक्षणाचा हक्क मोठा आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून ओबीसींचा घटनात्मक हक्क अबाधित ठेवत विविध समाजांच्या आरक्षणाच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. “मुंडे असते तर आरोप-प्रत्यारोपांत वेळ न घालवता पवारांसह सर्व नेत्यांना एका व्यासपीठावर आणून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघर्ष केला असता,” अशी भूमिका प्रा. लक्ष्मण हाके यांनी मांडली.

Share This Article
Exit mobile version