-विदर्भ पटवारी संघाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन; कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या शासकीय महसूल पथकावर झालेल्या कथित प्राणघातक हल्ल्याच्या घटनेने महसूल विभागात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. देऊळगाव राजा येथील तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, ग्राम महसूल अधिकारी आकाश खरात यांच्यासह शासकीय पथकावर झालेल्या हल्ल्याचा विदर्भ पटवारी संघ, उपविभाग शाखा सिंदखेड राजा यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. घटनेला सात ते आठ दिवस उलटूनही मुख्य आरोपीला अद्याप अटक झालेली नसल्याचा दावा संघटनेने केला असून, सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधातील कारवाई करताना महसूल विभागाच्या पथकांना आवश्यक ते पोलिस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, संवेदनशील कारवायांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करावी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करावी, अशी मागणीही विदर्भ पटवारी संघाने केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली तरच ते कोणत्याही दबावाशिवाय आपले कर्तव्य प्रभावीपणे पार पाडू शकतील, त्यामुळे प्रशासनाने या घटनेकडे महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा व्यापक प्रश्न म्हणून पाहावे, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. दरम्यान, मुख्य आरोपींसह सर्व संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर उपविभाग स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आवश्यकतेनुसार कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा विदर्भ पटवारी संघ, उपविभाग शाखा सिंदखेड राजा यांनी दिला आहे.

