अल निनोचा परिणाम? पावसाळ्यात कडक ऊन; फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीनवर संकट

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-१५ दिवसांपासून पावसाची दडी; फुलगळ सुरू, ३१ ऑगस्टपर्यंत दमदार पाऊस न झाल्यास पीक हातचे जाण्याची भीती

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पिके बहरात आली असताना ऑगस्ट महिन्यात मात्र केवळ एकाच दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने फुलांनी बहरलेले सोयाबीन आता माना टाकू लागले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली नाही, तर हातचे पीक जाण्याची शक्यता बळावली आहे.

सिंदखेडराजा तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून, ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. त्याखालोखाल २५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा आहे. तसेच शेतकऱ्यांनी इतर पिकांचीही लागवड केली आहे. हळदीची लागवड यशस्वी झाली असली तरी आता पाणी द्यावे लागत आहे. अनेक शेतकरी सोयाबीन पीक जगविण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर करीत आहेत. मात्र, सोयाबीनची लागवड मोठ्या क्षेत्रावर असल्याने उपलब्ध पाण्यावर सर्व क्षेत्राला पाणी देणे शक्य होत नाही. कोरडवाहू शेतीतील सोयाबीन पिकाची अवस्था दयनीय झाली आहे.

फुलांनी बहरलेले सोयाबीन दिसत असले तरी फळधारणेसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. पाण्याअभावी फुले गळून पडत आहेत. अगोदरच कीटकनाशकांच्या फवारणीवर हजारो रुपयांचा खर्च करून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच पावसाने दडी मारल्याने जोपर्यंत पीक घरात येत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. ३१ ऑगस्टपर्यंत दमदार पाऊस झाला नाही, तर हातचे पीक जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या महिन्यात ११ ऑगस्ट रोजी तालुक्यातील सातही मंडळांत पाऊस झाला होता. शेंदुर्जन मंडळात तब्बल ८९ मिमी पावसाची नोंद झाली असून, तेथे दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली आहे. तर सहा मंडळांत ४० ते ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा एक दिवस वगळता संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला आहे. आजपर्यंत या महिन्यात तालुक्यात सरासरी केवळ ३८.०५ मिमी पाऊस झाला आहे. पाऊस कमी झाल्याने आजही तलावांतील पाण्याची पातळी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Share This Article
Exit mobile version