चिखलीत पिस्टल बाळगणारा सराईत गुन्हेगार जाळ्यात; डीबी पथकाची मध्यरात्री कारवाई

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-४५ हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त; शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल

चिखली (महेंद्र हिवाळे) : चिखली पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने मध्यरात्री केलेल्या कारवाईत पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून ४५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले.

पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ ऑगस्ट रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल गवई, प्रशांत धंदर, अजय इटावा व राहुल पायघन हे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यासाठी गस्तीवर होते. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत ईश्वर धनवटे हा अग्नीशस्त्र बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता संभाजीनगर येथील गोपाल किराणा दुकानासमोर आरोपी पायी जाताना आढळून आला. पोलिसांनी रात्री १२.५० वाजता त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव ईश्वर प्रकाश धनवटे (वय २५, रा. गौरक्षणवाडी, ता. चिखली) असे सांगितले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला काळ्या रंगाची प्लास्टिक ग्रीप व गोल्डन स्टार असलेले देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले. मॅगझीनसह या पिस्टलची किंमत ४५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल गवई करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने केली.

Share This Article
Exit mobile version