-सर्व पदकविजेत्यांसह कडवी झुंज देणाऱ्या खेळाडूंची जम्मू-काश्मीर येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; स्व. शांतारामजी जगताप यांच्या नातींचीही चमकदार कामगिरी
परभणी / बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी): परभणी येथे २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याच्या खेळाडूंनी आपल्या अद्वितीय कौशल्याच्या जोरावर उत्तुंग यश संपादन केले आहे. बुलढाणा जिल्हा तलवारबाजी असोसिएशन अंतर्गत सहभागी झालेल्या ‘जिजाऊंच्या लेकींनी’ विविध क्रीडा प्रकारांत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांवर मोहर उमटवली. या राज्यस्तरीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर सर्व विजेत्या व पात्र खेळाडूंची जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी (National Fencing Championship) निवड झाली आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत तिन्ही प्रकारांमध्ये खेळाडूंनी वर्चस्व गाजवले:
सेबर प्रकार (Saber Event): कु. सोमश्री (सावी) पाटील हिने सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात कु. स्वरा जगताप आणि कु. क्रांती कुलट यांनी कांस्यपदक मिळवले.
इपी प्रकार (Epee Event): कु. शर्वरी मिसाळ हिने रौप्यपदक पटकावले, तर कु. अक्षरा पांडव व कु. आरोही क्षीरसागर यांनी कांस्यपदक मिळवले.
फॉइल प्रकार (Foil Event): कु. अन्विता सावळे हिने दुहेरी यश मिळवत एक रौप्य आणि एक कांस्यपदक आपल्या नावे केले, तर कु. ओवी आहेर हिने कांस्यपदकाची कमाई केली.
या स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये अवघ्या काही गुणांच्या फरकाने पदक हुकलेल्या, परंतु आपल्या शानदार खेळाच्या जोरावर रॅंकिंगमध्ये ‘टॉप १५’ मध्ये स्थान पटकावणाऱ्या खेळाडूंचेही विशेष कौतुक होत आहे. यामध्ये:
इपी प्रकार (Epee Event): सार्थक जाधव, देवांश चव्हाण, कुमारी खुशी वाघमारे
फॉइल प्रकार (Foil Event): शिवांश वाघमारे, सुखवीर जाधव
सेबर प्रकार (Saber Event): वीर कुलट, वेद शिंगणे, कार्तिक रिढे
या खेळाडूंनी शेवटच्या क्षणापर्यंत दिलेली कडवी झुंज आणि दाखवलेली क्रीडावृत्ती वाखाणण्याजोगी होती. हार न मानत त्यांनी दाखवलेल्या या जिद्दीचे असोसिएशनकडून विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
स्पर्धेत रौप्यपदक विजेती कु. शर्वरी मिसाळ आणि कांस्यपदक विजेती कु. स्वरा जगताप या शिवसेना बुलढाणा जिल्ह्याचे माजी उपजिल्हाप्रमुख स्व. शांतारामजी जगताप यांच्या नाती आहेत. जगताप व मिसाळ परिवारातील या कन्यांनी क्रीडाक्षेत्रातही राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या आजोबांच्या स्मृतींना अनोखी आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सचिव तथा प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील, आमदार श्वेताताई महाले पाटील, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे,आमदार संजय भाऊ गायकवाड‘पीएमआरडीए’चे माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांच्यासह सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
मार्गदर्शन आणि संचालक मंडळाकडून कौतुकाची थाप
खेळाडूंच्या या घवघवीत यशामागे प्रशिक्षक आकाश बनसोड सर (NIS Coach) यांचे अथक परिश्रम व नियमित सराव कारणीभूत ठरला आहे. तसेच, असोसिएशनचे सचिव शिवश्री शेषनारायण लोढे सर, राज्य शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त शिक्षक, अध्यक्ष शिवश्री शिवाजी राजे जाधव, उपाध्यक्ष शिवश्री मयूर पाटील बाहेकर, सहसचिव शिवश्री नितीन पाटील जेऊघाले आणि शिवश्री प्रवीण मिसाळ सर (जिल्हा समन्वयक, संभाजी ब्रिगेड तथा संपादकीय संचालक, ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज मीडिया) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय पातळीवर जम्मू-काश्मीर येथे महाराष्ट्राचे आणि बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या सर्व खेळाडूंना बुलढाणा जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या संचालक मंडळाने, क्रीडाप्रेमींनी आणि पालकांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत

