-राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान जिल्हास्तरीय निवड समितीवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल केला सन्मान
अंकुश पाटील (चिखली) : आळंदी : महाराष्ट्र शासनाच्या राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान जिल्हास्तरीय शासकीय निवड समितीवर बुलढाणा जिल्हा वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री. दामुअण्णा महाराज शिंगणे यांची सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यपावन एकादशीच्या दिवशी शिंगणे महाराज माऊलींच्या समाधी दर्शनासाठी आळंदी येथे पोहोचले असता, संस्थान कमिटीच्या विश्वस्तांनी त्यांना कार्यालयात बोलावून सन्मानपूर्वक सत्कार केला. यावेळी संस्थानचे विश्वस्त श्री. पुरुषोत्तम दादा पाटील व पालखीचे मानाचे चोपदार श्री. राजाभाऊ महाराज यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त श्री. पुरुषोत्तम दादा पाटील यांनी शिंगणे महाराज यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने योग्य पदावर योग्य व्यक्तीची निवड करून वारकरी संप्रदायाला न्याय देण्याचे काम केले असल्याचे सांगत शासनाचे आभार मानले. तसेच शिंगणे महाराज हे इतर क्षेत्रातील कलावंतांबरोबरच वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक व इतर गुणवंतांना निश्चितच प्राधान्य देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
‘माऊलीच्या दरबारात झालेला सन्मान हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आहे,’ असे मनोगत शिंगणे महाराज यांनी व्यक्त केले. या वेळी श्री. पुरुषोत्तम दादा पाटील, विश्वस्त, श्री. राजाभाऊ चोपदार, कीर्तनकेसरी श्री. पुरुषोत्तम महाराज भुतेकर, श्री. गोविंद महाराज गोरे, श्री. निवृत्ती महाराज कदम, श्री. शंकरजी महाराज, श्री. प्रदीप महाराज बनकर, श्री. विकास महाराज पाटील, श्री. बळीराम महाराज जोगदंड, श्री. विष्णू महाराज वडजे, श्री. नंदकिशोर महाराज गोरे यांच्यासह इतर वारकरी व कीर्तनकार उपस्थित होते.

