मध्यरात्री कमरेला पिस्टल; चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने सराईत गुन्हेगाराला उचलले

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई; ४५ हजारांची देशी बनावटीची पिस्टल जप्त

चिखली (प्रतिनिधी) : शहरात रात्रीच्या वेळी गस्त घालत असलेल्या चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीच्या पिस्टलसह ताब्यात घेतले. ईश्वर प्रकाश धनवटे (वय २५, रा. गौरक्षणवाडी, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ४५ हजार रुपये किमतीची पिस्टल जप्त करण्यात आली आहे.

चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यासाठी पोलीस पथक रात्री गस्तीवर होते. यावेळी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत ईश्वर धनवटे हा अग्नीशस्त्र जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, संभाजीनगर, चिखली येथील गोपाल किराणा दुकानासमोरून एक इसम पायी जाताना पोलिसांना आढळून आला. रात्री सुमारे १२.५० वाजता त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव ईश्वर प्रकाश धनवटे असल्याचे सांगितले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता कमरेच्या उजव्या बाजूस एक पिस्टल आढळून आले.

४५ हजारांची देशी बनावटीची पिस्टल जप्त

पोलिसांनी जप्त केलेल्या पिस्टलची पाहणी केली असता ती देशी बनावटीची असल्याचे निष्पन्न झाले. पिस्टलच्या हँडलवर काळ्या रंगाची प्लास्टिक ग्रीप असून, त्यावर दोन्ही बाजूंना गोल्डन रंगातील पंचकोनी स्टारचे चिन्ह असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. मॅग्झीनसह या पिस्टलची अंदाजे किंमत ४५ हजार रुपये असल्याने ती पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शामराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून चिखली पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल गवई करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाने केली. कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल गवई, अजय इटावा, प्रशांत धंदर, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल पायघन, निलेश सावळे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल ललिता खरात व महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली उगले यांचा सहभाग होता.

Share This Article
Exit mobile version