साखरखेर्डा नगरीत दोन्ही कावड यात्रांचे दणदणीत स्वागत; सर्वच मंदिरांत जलाभिषेक

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-सनातन हिंदू कावड यात्रेसह महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या कावड यात्रेने शहरात भक्तिमय वातावरण; पोलिसांचा चोख बंदोबस्त

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : गेल्या १७ वर्षांपासून साखरखेर्डा येथे कावड यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. आज, २४ ऑगस्ट रोजी सनातन हिंदू कावड यात्रा प्रयागराज येथून साखरखेर्डा येथे दाखल झाली आणि सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर दुपारी अखंड कावड यात्रेचीही भव्य मिरवणूक काढण्यात आली. दोन्ही कावड यात्रांमुळे संपूर्ण नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

सकाळी ११ वाजता सनातन हिंदू कावड यात्रा साखरखेर्डा नगरीत पोहोचली. भोगावती नदीवर महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने पूजाअर्चा केली. त्यानंतर खालचे बसस्थानक, गणपती चौक, गुजरी चौक, दगडी मस्जिद, श्री पलसिद्ध महास्वामी मठ, बसस्थानक परिसर मार्गे महाराणा प्रतापसिंह नगर येथे मिरवणुकीचा समारोप झाला. गावातील मुख्य रस्त्यावर महिलांनी रांगोळ्या काढून कावड यात्रेचे स्वागत केले. यावेळी विविध मंदिरांत जलाभिषेक करण्यात आला. श्री पलसिद्ध महास्वामी मठात मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी दोन्ही कावड यात्रांचे स्वागत केले. यावेळी शंकरचरणी नतमस्तक होत भक्तिभावाचा सुरेख संगम पाहायला मिळाला.

दुपारी तीन वाजता महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ओलांडेश्वर येथून जल घेऊन कावड यात्रा साखरखेर्डा येथे पोहोचताच भोगावती नदीवरील श्री महाकालेश्वर मंदिर परिसरात कावड यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. तेथून माळीपुरा, अहिल्या नगर, गणपती चौक, गुजरी चौक, दगडी मस्जिद, श्री पलसिद्ध महास्वामी मठ, बसस्थानक परिसर मार्गे महाकालेश्वर मंदिर परिसरात यात्रेचा समारोप करण्यात आला. मार्गावर ठिकठिकाणी कावड यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. अनेक भाविकांनी कावड यात्रेतील सहभागींसाठी फराळाची व्यवस्था केली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे आणि ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेदरम्यान चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्य रस्त्यावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले होते. दोन्ही कावड यात्रांमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.

Share This Article
Exit mobile version